( संगमेश्वर /प्रतिनिधी )
दूध व्यवसायाला चालना देतानाच स्थानिक शेतकऱ्यांना नियमित उत्पन्नाचा आधार देणाऱ्या कडवई विकास सोसायटीच्या दूध संकलन केंद्राने कोकण विभागात उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. म्हैस दूध संकलित करून वारणा दूध संघाला पुरवठा करण्याच्या कामगिरीत कडवई विकास सोसायटीच्या दूध संकलन केंद्राने कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सोसायटीचा रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.
कडवई विकास संस्थेने २२ ऑगस्ट २०२१ रोजी तूरळ येथे दूध संकलन केंद्राची सुरुवात केली. स्थापनेपासून आजपर्यंत कोणत्याही तक्रारीला वाव न देता दूध उत्पादकांना वेळेत पैसे अदा करण्यावर संस्थेने भर दिला. या उपक्रमामुळे परिसरातील दूध उत्पादकांना नियमित उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होण्याबरोबरच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधीही निर्माण झाल्या. परिणामी परिसरातील दूध व्यवसायाला चालना मिळाल्याचे संस्थेचे चेअरमन दत्ताराम ओकटे यांनी सांगितले.
दरम्यान, म्हैस दूध संकलन करून ते वारणा दूध संघाला पुरविण्यात कडवई विकास सोसायटीने कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळविला आहे. या कामगिरीची दखल घेत सोमवार, २८ सप्टेंबर २०२६ रोजी वारणा नगर, कोल्हापूर येथे होणाऱ्या वारणा दूध संघाच्या सर्वसाधारण सभेत कडवई विकास सोसायटीचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. या वेळी सोसायटीचे चेअरमन दत्ताराम ओकटे, उपाध्यक्ष दीपक गिज्ये, सचिव विकास बेटकर, तसेच संचालक मोहन ओकटे, सुहेल पांगारकर आणि प्रगतिशील शेतकरी संतोष गोटेकर, विनायक राजेशिर्के, कृष्णा ओकटे यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित राहणार आहेत.
वारणा दूध संघाचे अध्यक्ष तथा जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दूध संकलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडत त्यांच्या उत्पन्नाला स्थैर्य देण्याच्या प्रयत्नांना मिळालेली ही पावती असल्याची भावना कडवई विकास सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.


