(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवास गणपतीपुळे येथे रविवार, दिनांक 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावर्षीच्या जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य ‘डिजिटल अजेंडा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे पर्यटनाची पुनर्रचना’ असे आहे. या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे येथे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये गणपतीपुळे बीच स्वच्छता अभियानाचा समावेश आहे. तसेच मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज, मालगुंड येथे निबंध स्पर्धा आणि जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, गणपतीपुळे येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पर्यटक निवास गणपतीपुळे येथे वास्तव्यास असलेल्या पर्यटकांच्या सहभागातून वृक्षारोपण कार्यक्रमही घेण्यात येणार आहे. तसेच पर्यटक निवासात येणाऱ्या पर्यटक पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येणार आहे.
जागतिक पर्यटन दिनानिमित्त गणपतीपुळे परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या विविध उपक्रमांमध्ये पर्यटनप्रेमी, पर्यटन व्यावसायिक तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन एमटीडीसीच्या पर्यटक निवासाचे व्यवस्थापक व कर्मचारी यांनी केले आहे.


