(रत्नागिरी / प्रतिनिधी)
नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला जिल्ह्यात मोठा फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. सात नगर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एकूण १५१ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत या पक्षाला केवळ चिपळूण नगर परिषदेत दोनच जागांवर समाधान मानावे लागले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाल्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत दाखल झाले. परिणामी शरद पवार यांच्या पक्षाची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे या निवडणूक निकालांतून अधोरेखित झाले आहे. चिपळूण आणि रत्नागिरी या दोन ठिकाणी काही मोजके पदाधिकारी व कार्यकर्ते शरद पवार यांच्यासोबत ठामपणे उभे राहिल्याने, येथे पक्षाला काही प्रमाणात यश मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटासोबत आघाडी असतानाही अपेक्षित कामगिरी करण्यात पक्ष अपयशी ठरला.
निवडणूकांच्या निकालांनुसार, चिपळूण वगळता रत्नागिरी, राजापूर, खेड, लांजा, देवरुख आणि गुहागर या नगर परिषद व नगर पंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात या पक्षाची घसरण ठळकपणे समोर आली आहे.

