(राजापूर / वार्ताहर)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोदवलीनजीक शुक्रवारी (दि. २५ सप्टेंबर) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मालवाहू कंटेनर डिव्हायडरला धडकून पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०४ जेके ७०३९ क्रमांकाचा मालवाहू कंटेनर मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होता. कोदवलीनजीक आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कंटेनर महामार्गाच्या डिव्हायडरला जोरात धडकला आणि रस्त्यावरच पलटी झाला.
अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त कंटेनरची पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली. या दुर्घटनेत चालकाला किरकोळ दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, अपघाताची नोंद करण्यासह पुढील कार्यवाही राजापूर पोलीस करत आहेत.


