(राजापुर / तुषार पाचलकर)
विद्यार्थीदशेत राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागात स्वयंसेवक म्हणून कार्य करताना विद्यार्थ्यांना समाजातील विविध प्रश्नांची जाणीव होते. स्वतःचा अनमोल वेळ देऊन समाजात सकारात्मक बदल घडवून आणता येतो, तसेच कोणत्याही सुधारणेची सुरुवात स्वतःपासून केल्यास समाजबदलाला गती मिळते, याची जाणीव विद्यार्थ्यांना एनएसएसच्या माध्यमातून होते. तरुणाई समाजासाठी मोठे योगदान देऊ शकते. या विभागात कार्य करताना विद्यार्थ्यांना विविध संधी मिळत असल्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत एनएसएसची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास पाटील यांनी केले.
श्री. मनोहर हरी खापणे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित ‘एनएसएस सप्ताहा’च्या उद्घाटनप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. विद्यार्थ्यांनी एनएसएसमध्ये अधिक सजगतेने कार्य करून स्वतःबरोबरच महाविद्यालयाचे नावही उज्ज्वल करावे, असे आवाहन डॉ. पाटील यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. ए. डी. पाटील होते. यावेळी प्रा. एस. जी. चव्हाण, प्रा. एस. एस. धोंगडे, प्रा. एस. व्ही. निंबाळकर, डॉ. बी. टी. दाभाडे, प्रा. एन. जी. देवण, प्रा. पी. पी. राठोड, प्रा. पी. के. कांबळे आणि ग्रंथपाल डॉ. मनोहर कोंडागुर्ले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
प्रास्ताविकातून प्रा. एस. जी. चव्हाण यांनी एनएसएस सप्ताहादरम्यान राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये स्वच्छता अभियान, नशामुक्त अभियान, टीबीमुक्त अभियान आणि अवयवदान यासंदर्भातील उपक्रमांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. ए. डी. पाटील म्हणाले, “एनएसएसमध्ये काम करणारा स्वयंसेवक हा हरहुन्नरी बनतो. तो स्वतःबरोबरच समाजातही बदल घडवून आणण्यासाठी कार्यतत्पर असतो.” विद्यार्थ्यांनी सेवाभावी वृत्तीने एनएसएस विभागात कार्य करून स्वतःच्या विकासाबरोबरच समाजाच्या विकासासाठीही योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. एस. जी. चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


