(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रस्त्यावर वाहनांची संख्या वाढत असताना वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या कोंडीचा फटका सर्वसामान्य वाहनचालकांना बसत असला, तरी काही क्षणांचा विलंबही एखाद्या रुग्णासाठी जीवघेणा ठरू शकतो. अशा परिस्थितीत रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकल्याचे आणि तिच्या पुढे-मागे असलेल्या वाहनांना बाजूला होऊन मार्ग करून देण्यास विलंब होत असल्याचे चित्र रत्नागिरी शहरात अधूनमधून दिसून येते.
रुग्णवाहिकेचा सायरन ऐकू येतो, दिवे चमकताना दिसतात; मात्र कोंडीमध्ये अडकलेल्या वाहनचालकांना नेमके काय करावे, याबाबत अनेकदा संभ्रम निर्माण होतो. परिणामी रुग्णवाहिकेला पुढे जाण्यास आवश्यक असलेली जागा उपलब्ध होत नाही. काही सेकंद वाचविण्यासाठी किंवा स्वतःचे वाहन पुढे नेण्याच्या घाईत रुग्णवाहिकेला मार्ग न मिळणे, ही केवळ वाहतुकीची समस्या नसून मानवी संवेदनशीलतेची कसोटी आहे. रुग्णवाहिका मागून येताना दिसल्यास वाहनचालकांनी घाबरून अचानक ब्रेक न मारता, परिस्थितीनुसार सुरक्षितपणे वाहन बाजूला घेत रुग्णवाहिकेला पुढे जाण्यास जागा करून देणे आवश्यक आहे. रुग्णवाहिका पुढे अडकली असल्यास तिच्या पुढील वाहनांनीही शक्य तितके सुरक्षित अंतर ठेवून मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
विशेषतः चौक, अरुंद रस्ते आणि वाहतूक कोंडीच्या ठिकाणी ‘रस्ता माझा’ या मानसिकतेऐवजी ‘हा मार्ग रुग्णाचा आहे’, ही भावना प्रत्येक वाहनचालकाने ठेवणे आवश्यक आहे. रुग्णवाहिकेत उपचाराची गरज असलेला रुग्ण असतो. अपघातग्रस्त, हृदयविकाराचा झटका आलेला, गंभीर आजारी किंवा प्रसूतीसाठी रुग्णालयात नेण्यात येणाऱ्या व्यक्तीसाठी रुग्णालयापर्यंतचा प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो. त्यामुळे रुग्णवाहिकेला वाट करून देणे म्हणजे केवळ वाहतुकीचा नियम पाळणे नव्हे; एखाद्याच्या आयुष्याला वेळ देणे होय.
रत्नागिरी शहरातील वाढती वाहनसंख्या, अरुंद रस्ते आणि गर्दीच्या वेळेतील कोंडी पाहता रुग्णवाहिकांसाठी मार्ग मोकळा ठेवण्याबाबत वाहनचालकांमध्ये सातत्याने जनजागृती होण्याची गरज आहे. वाहतूक पोलिस, स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनीही याबाबत सामूहिक पातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे. रुग्णवाहिकेचा सायरन ऐकू आला की, ‘मला किती उशीर होईल?’ असा विचार न करता ‘या रुग्णाला किती वेळ वाचेल?’ असा विचार करण्याची आता गरज आहे.


