(चिपळूण)
भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष व माजी नगरसेवक परिमल भोसले हे रविवारी, दि. १ मार्च रोजी सकाळी ११ वाजता शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश सोहळा चिपळूण शहरातील राधाताई लाड वैश्य भवन सभागृहात होणार असून राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत आणि कुडाळ–मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
परिमल भोसले हे आमदार निलेश राणे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांनी नगरसेवकपदासह भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली आहे. चिपळूण नगर परिषद निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपच्या सर्व पदांचा व सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. अखेर त्यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
या पक्षप्रवेश सोहळ्यास शिवसेना उपनेते व माजी आमदार सदानंद चव्हाण, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख श्रीमती रश्मी गोखले, उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, चिपळूण तालुकाप्रमुख संदेश आयरे, नगराध्यक्ष व शिवसेना चिपळूण शहरप्रमुख उमेश सकपाळ यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

