( रत्नागिरी )
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या नूतन वाचन कक्षाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. “या वाचनालयाचा पुरातन वारसा जतन व्हावा आणि तो नव्या युगासमोर अधिक समृद्ध स्वरूपात सादर व्हावा, यासाठी नवीन वास्तू उभारणी अत्यावश्यक होती,” असे भावोद्गार वाचनालयाचे अध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
केवळ नऊ महिन्यांत तब्बल ४,००० चौ. फूटांचे सुसज्ज बांधकाम पूर्ण झाले असून, आज या प्रशस्त वाचन विभागाचे उद्घाटन दीपक गद्रे, मायदेश फाउंडेशनचे अरुण जोशी, डॉ. अलिमिया परकार, डॉ. श्रीरंग कद्रेकर, अभिजीत हेगशेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
अध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात वाचनालयाच्या लीज करारासाठी तब्बल २४ वर्षे चाललेल्या संघर्षाची आणि त्यामागील अथक पाठपुराव्याची माहिती उपस्थितांना दिली. त्यांनी सांगितले की, “रत्नागिरी नगर वाचनालय हे शासन चालवत नाही. निधी समाजातून उभा करावा लागतो, परंतु लोकांमध्ये गैरसमज आहे की हे वाचनालय शासन चालवते. जुन्या इमारतीला केवळ कॉस्मेटिक ट्रीटमेंटने टिकवणे शक्य नव्हते, त्यामुळे नवीन वास्तू उभारणे आवश्यक झाले.”
त्यांनी पुढे सांगितले की, समाजातील विविध घटकांच्या सहकार्याने आणि मायदेश फाउंडेशनच्या पुढाकाराने हे स्वप्न साकार झाले. “मायदेश फाउंडेशन वाचनालयाला अद्ययावत स्वरूप देईल आणि आम्ही पूर्ण सकारात्मकतेने त्यांच्यासोबत कार्यरत राहू,” असेही पटवर्धन म्हणाले.
या प्रसंगी मायदेश फाउंडेशनचे मुख्य प्रवर्तक अरुण जोशी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “या ऐतिहासिक वाचनालयाला नवा साज देताना त्यातील परंपरा, इतिहास आणि प्रेरणादायी संदर्भ अधिक उजळविण्यासाठी अनेक प्रकल्प राबविण्याचा आमचा मानस आहे. अभिजीत हेगशेटे यांनी वाचनालयाच्या ऐतिहासिक प्रवासातील अनेक किस्से सांगत या संस्थेचे महत्त्व अधोरेखित केले, तर चंद्रशेखर पटवर्धन यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. वाचनालयाच्या नव्या इमारतीसाठी भरीव आर्थिक योगदान देणाऱ्या संस्था, बँका आणि व्यक्तींचा शाल–श्रीफळ व पुष्पकरंडक देऊन सन्मान करण्यात आला.
सन्मानितांमध्ये स्वरूपानंद पतसंस्था, विजय देसाई, सौ. अरुणा पटवर्धन, दीपक गद्रे, सौ. प्रभुदेसाई, सौ. सुखदा देव, देवेंद्र जोशी, रत्नागिरी मध्य. सह. बँक, मध्यवर्ती बँक कर्मचारी युनियन, सतीश कामत, संदीप कदम, जयप्रकाश पाखरे, पितांबरी उद्योग, मायदेश फाउंडेशनचे अरुण जोशी, डॉ. सुहास कुलकर्णी आदींचा समावेश होता. कंत्राटदार रूपेश साळवी, अंतर्गत सजावट करणारे श्री. माजकर, तसेच मूव्हर्स अँड पॅकर्सचे श्री. रसाळ यांनाही सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला शिरीष दामले, श्री. बर्वे, माजी प्राचार्य डॉ. सुखटणकर, अॅड. शबाना वस्ता, अॅड. चंदगडकर, श्रीराम भावे, माधव गोगटे, सचिन करमरकर, उमेश कुलकर्णी, डॉ. जवळीकर, राजन मलुष्टे, अॅड. सौ. मयेकर यांसह अनेक मान्यवर, नागरिक आणि वाचनालयाचे समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन आनंद पाटणकर यांनी केले. उपस्थितांनी वाचनालयाचे नवे रूप अत्यंत आकर्षक व प्रेरणादायी असल्याचे सांगत समाधान व्यक्त केले.

