(राजापूर)
राजापूर तालुक्यातील दळे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या दळे, तुळसुंदे, होळी आणि वाघ्रण या गावांमधील रस्ते व सार्वजनिक ठिकाणे आता सोलर पथदिपांच्या प्रकाशाने उजळली आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून हे काम पूर्ण झाले असून ग्रामस्थांची दीर्घकालीन मागणी अखेर पूर्ण झाली आहे.
दिलेलं आश्वासन पूर्ण करणे ही राणे कुटुंबीयांची खास ओळख असल्याची प्रचिती या कामातून पुन्हा एकदा आली आहे. या गावांमध्ये सोलर लाईट बसविण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत होती. या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते जब्बार काझी यांनी कुडाळ-मालवणचे आमदार व माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून खासदार नारायण राणे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांना यश येत ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
या निधीतून २२ सोलर पथदिपांची बसवणूक करण्यात आली असून गावांतील मुख्य रस्ते, अंतर्गत मार्ग आणि सार्वजनिक ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी हे दिवे लावण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरात प्रकाशव्यवस्था सुधारली असून रात्रीच्या वेळी होणारी गैरसोय मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे.
सोलर पथदिपांमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा रात्रीचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर होणार आहे. तसेच पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर वाढल्याने वीज बचतीलाही हातभार लागणार आहे.
या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार नारायण राणे तसेच विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांचे स्वीय सहाय्यक योगेश मगदूम यांचे ग्रामस्थांनी आभार मानले आहेत. यासोबतच सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते जब्बार काझी यांचेही ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले आहे.

