(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
शहर परिसरात पोलिसांकडून सुरू असलेल्या रात्रीच्या गस्तीमध्ये भाट्ये-मुरकरवाडी परिसरात अंमली पदार्थाचे सेवन करीत असल्याच्या संशयावरून एका तरुणावर कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून अर्धवट जळालेला सिगारेटचा थोटक आणि एक जुना लाईटर असा साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई १९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.०५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक रत्नागिरी शहर परिसरात रात्री पेट्रोलिंग करीत होते. भाट्ये, मुरकरवाडीच्या दिशेने जात असताना मुरकरवाडी स्टॉपजवळ बंधाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या स्ट्रीटलाईटच्या खांबाखाली एक इसम संशयास्पदरीत्या आढळून आला. पोलिसांनी त्याची तपासणी केली असता मर्जान अब्दुल्ला तांडेल (वय ३०, रा. राजीवडा नाक्याजवळ, रत्नागिरी) हा अंमली पदार्थ सेवन करीत असल्याचे आढळून आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्याच्याकडे अंमली पदार्थ सेवनासाठी वापरले जाणारे साहित्यही आढळले. कारवाईदरम्यान अर्धवट जळालेला सिगारेटचा थोटक आणि १० रुपये किमतीचा पिवळ्या रंगाचा जुना लाईटर असा एकूण १० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोहेकॉ. विक्रम अंबाजी पाटील (वय ४७) यांनी फिर्याद दिली. रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क) आणि २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर परिसरात अंमली पदार्थांच्या सेवनावर आणि गैरप्रकारांवर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात असून, रात्रीच्या गस्तीमध्ये संशयास्पद हालचालींवरही बारकाईने नजर ठेवली जात असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिस करीत आहेत.


