(खेड/ रत्नागिरी)
आंबडस येथे चायनीज खाऊन तिघे जण एकाच दुचाकीवरून भेलसईकडे परतत असताना दुचाकीवरील चालकाचा ताबा सुटून ती पुलाच्या सिमेंटच्या कठड्यावर आदळली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार रुपेश सुरेश धाडवे (वय ३४, रा. भेलसई गंग धाडवेवाडी, ता. खेड) याचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला. तर दुचाकीवरील अन्य दोघे जखमी झाले आहेत. ही घटना १२ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १०.४५ वाजता भेलसई चौथाई येथील पुलाच्या मागील बाजूस असलेल्या वळणावरील उतारात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दर्शन अनंत धाडवे, त्यांचा चुलत भाऊ मयत रुपेश सुरेश धाडवे आणि सर्वेश शिवाजी धाडवे हे तिघे आंबडस येथून चायनीज खाऊन आंबडस-भेलसई शेल्डी मार्गे भेलसईकडे परतत होते. तिघेही यामाहा मोटारसायकल क्रमांक एमएच ४३ सीएफ २१७७ वरून प्रवास करीत होते. भेलसई चौथाई येथील पुलाच्या मागील बाजूस असलेल्या वळणावरील उतारात दुचाकी चालविताना रुपेश धाडवे याचा वाहनावरील ताबा सुटला. रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष न देता दुचाकी निष्काळजीपणे आणि बेदरकारपणे चालविल्याने ती पुलाच्या सिमेंटच्या कठड्यावर जाऊन आदळल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या धडकेत रुपेश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. अपघातात सर्वेश शिवाजी धाडवे यांच्या उजव्या डोळ्याजवळ दुखापत, तर फिर्यादी दर्शन धाडवे यांच्या उजव्या हाताच्या करंगळीशेजारील बोटाला मुकामार लागला. तसेच दुचाकीच्या पुढील चाकाच्या शो व हेडलाईटचे नुकसान झाले. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७७/२०२६ नुसार चौकशी करण्यात आली. अपघातानंतर फिर्यादी मुंबई येथे गेले होते. त्यानंतर खेड पोलिस ठाण्यात हजर राहून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम १०६(१), २८१, १२५(अ)(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १२८/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खेड पोलिस करीत आहेत.


