(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
शहर परिसरात पोलिसांकडून सुरू असलेल्या गस्तीच्या दरम्यान आठवडा बाजाराच्या मागील बाजूस पाण्याच्या टाकीजवळ हेरॉईनसदृश अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगल्याच्या संशयावरून दोघांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत सुमारे १ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १८ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १०.४० वाजता करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी शहर परिसरात शासकीय वाहनातून पेट्रोलिंग करीत होते. माळनाका, साळवी स्टॉप, नाचणे रोड, एसटी स्टँड परिसरात गस्त घातल्यानंतर पोलिस पथकाने आठवडा बाजार परिसराकडे मोर्चा वळविला. यावेळी आठवडा बाजाराच्या मागील बाजूस पाण्याच्या टाकीजवळ रस्त्यावर शिवकुमार चौधरी उर्फ शिवबहादूर सोनार (वय ३२) हा संशयास्पदरीत्या आढळून आला. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याच्या ताब्यात पारदर्शक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये उग्र वासाचा ब्राऊन हेरॉईनसदृश अंमली पदार्थ आढळला. प्लास्टिक पिशवीसह त्याचे वजन सुमारे ७ ग्रॅम असून, त्याचे लहान पुड्यांमध्ये विभाजन करण्यात आले होते. एकूण २४२ पुड्या आढळून आल्या असून, प्रत्येक पुडीची किंमत ५०० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या अंमली पदार्थाची किंमत १ लाख २१ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याशिवाय पदार्थ ठेवण्यासाठी वापरण्यात आलेली भगव्या रंगाची प्लास्टिकची रिकामी पिशवी आणि पुड्या बांधण्यासाठी वापरण्यात आलेले २४२ लहान कागदाचे तुकडे असा मुद्देमालही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ३६ हजार रुपये असल्याचे पोलिस नोंदीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी शिवकुमार चौधरी उर्फ शिवबहादूर सोनार याच्यासह दुर्गाजीत बहादूर (वय ३१) यालाही आरोपी करण्यात आले आहे. दोघेही सध्या रत्नागिरीतील पांढरा समुद्र-मख्खवाडा परिसरात राहत असून, ते मूळचे नेपाळमधील कैलाली जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या कारवाईप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोहेकॉ. अमित अशोक कदम (वय ४१) यांनी फिर्याद दिली आहे. रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क) आणि २१(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमली पदार्थाची विक्री करण्याच्या उद्देशाने तो जवळ बाळगल्याचा आरोप असून, जप्त केलेला पदार्थ पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिस करीत आहेत.


