(खेड / वार्ताहर)
मागील वादाचा राग मनात धरून तिघांनी शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली आणि त्यापैकी एकाने बांबूच्या काठीने मारहाण केल्याची घटना खेड तालुक्यातील चाकाळे हनुमाननगर येथे घडली. या मारहाणीत राजेश सखाराम कदम (४५) हे जखमी झाले असून, त्यांच्या फिर्यादीवरून तिघांविरोधात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश कदम हे १८ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे एकच्या सुमारास चाकाळे हनुमाननगर येथील ललिता घाणेकर यांच्या भाड्याच्या घरासमोर बसले होते. त्यावेळी मागील वादाचा राग मनात धरून संशयित आरोपी तेथे आले. त्यांनी कदम यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. यावेळी आरोपी क्रमांक एक असलेल्या दिपक पांडुरंग भिलारे याने सोबत आणलेल्या बांबूच्या काठीने कदम यांच्या डोक्यात, दोन्ही हातांवर, पाठीवर तसेच छातीवर मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या मारहाणीत कदम यांना दुखापत झाली.
या प्रकरणी राजेश सखाराम कदम यांच्या फिर्यादीवरून दिपक पांडुरंग भिलारे, पुष्पा पांडुरंग भिलारे आणि दिपक भिलारे यांचा नाव माहीत नसलेला मुलगा, अशा तिघांविरोधात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.


