(मंडणगड)
शहरालगत असणाऱ्या रहदारीच्या ठिकाणी भिंगळोलीमध्ये रात्रीच्या वेळेस इनोव्हा गाडीतून गायी- गुरांना भूलीचे इंजेक्शन व खाद्यातून खायला देऊन त्यांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ६ डिसेंबर रोजी रात्री १२ च्या सुमारास भिंगळोली ते धुत्रोली मार्गावर एका दुकानाच्या लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्या तक्रारी दाखल केल्या आहेत.
सीसीटीव्हीमध्ये दिसून येणाऱ्या चित्रिकरणानुसार रात्री १२च्या दरम्यान एका इनोव्हा गाडीतून एक इसम उतरून भिंगळोली ते धुत्रौली रस्त्यालगत बसलेल्या जनावरांना त्यांचे लक्ष नसताना इंजेक्शन मारताना स्पष्ट दिसत आहे.
घाबरून ही गुरे जात असताना त्यांना थांबवण्यासाठी दुसरी व्यक्ती आपल्या हातातील पिशवीतून त्या ठिकाणी खाण्यासाठी काही खाद्यपदार्थ फेकतो. यानंतर या जनावरांमध्ये एक प्रकारची शिथिलता आलेली पहायला मिळते व ही जनावरे त्याच ठिकाणी धुंद अवस्थेत बसलेली दिसून येतात. यानंतर ही इनोव्हा गाडी बसलेल्या गायी-गुरांच्या ठिकाणी लावून त्यातून उतरलेल्या व्यक्ती इनोव्हा गाडीमध्ये गुरे भरतात. गुरे गाडीत भरल्यानंतर हे चोरटे त्या ठिकाणाहून पसार होत असल्याचे दृश्य दिसून येत आहे. अंतरा अंतरानंतर पुन्हा ही गाडी त्याच ठिकाणी येऊन या रस्त्यालगत बसलेल्या जनावरांना गाडीमध्ये भरून पसार होताना दिसत आहे. दुसऱ्याच दिवशी नारगोल परिसरामध्ये मांसाचे तुकडे आणि रक्त पडल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ येथे पाहणी केली. ६ डिसेंबर रोजी सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली घटना आणि ७ डिसेंबर रोजी नारगोली परिसरातील घटना याचा परस्पर संबंध आहे का यादृष्टीने पोलीस तपास सुरू आहे.
याबाबत पोलिस स्थानकात तक्रार दाखल होताच मंडणगड पोलिसांनी धुत्रोली येथून पशुधनाची चोरी करणाऱ्या एकाच्या मुंबईतून मुसक्या आवळल्या आहेत. जाफर अन्वर शेख (३४, रा. नेहरूनगर, मुंबई) असे त्याचे नाव आहे.
सीसीटीव्हीत दिसणाऱ्या घटनेमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा लागला आणि त्या अनुषंगाने सीसीटीव्हीचा मागोवा घेत मंडणगड पोलिसांनी थेट मुंबई शहर गाठले. या प्रकरणात तपास करताना त्यांनी स्थानिक मुंबई पोलिसांची मदत घेतली आणि नेहरूनगर, वांगणी, एकविरानगर, चुनाभट्टी या परिसरातील संशयिताच्या मुसक्या आवळल्या. त्यातील एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, मंडणगड येथे आणण्यात आले आहे.
दहा वर्षांपासूनच्या चोरीचा लागणार छडा
या संदर्भात अधिक धागेदोरे मिळत आहेत का याचा तपास पोलिस करत आहेत. या प्रकरणातील आणखी उर्वरित तीन संशयितांपर्यंत पोहोचण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत. पोलिसांच्या कामगिरीमुळे मंडणगडातून मागील दहा वर्षांपासून गायब होणाऱ्या पशुधनाचा छडा लागणार आहे.