(रत्नागिरी / प्रतिनिधी)
गणरायाच्या स्वागतासाठी कोकणची वाट धरणाऱ्या चाकरमान्यांच्या उत्साहावर रेल्वेच्या प्रचंड विलंबाने पाणी फेरले आहे. गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या सोडून प्रवाशांची सोय केल्याचा गाजावाजा होत असतानाच प्रत्यक्ष प्रवासात मात्र गणेशभक्तांना तासन्तास स्थानकांवर ताटकळत बसण्याची वेळ आली आहे. नियमित गाड्यांसह गणपती विशेष गाड्यांच्या वेळापत्रकाचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र असून, दादर–कुडाळ गणपती स्पेशल तब्बल १८ तास उशिराने, तर जबलपूर–कोईम्बतूर स्पेशल ११ तास विलंबाने धावत होती.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांचे नियोजन केले असले तरी त्या वेळेत धावण्याची जबाबदारी पार पाडण्यात मात्र प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. दोन प्रमुख गाड्यांच्या विलंबाचा फटका इतर सुमारे २० गाड्यांच्या वेळापत्रकालाही बसल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक व्यवस्थेचे नियोजन किती विस्कळीत झाले आहे, याची कल्पना येते. गणपतीच्या दर्शनासाठी घर गाठण्याची घाई, हातात सामान आणि डोळ्यांत प्रतीक्षा; मात्र रेल्वेचा पत्ता नाही, अशी अवस्था अनेक प्रवाशांची झाली. तासन्तास गाडीची वाट पाहावी लागल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि कुटुंबासह प्रवास करणाऱ्या भाविकांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे. काही प्रवाशांचा पुढील प्रवासाचा संपूर्ण बेतच कोलमडला असून, नियोजित वेळेत गावी पोहोचण्याची आशाही मावळली आहे.
विशेष गाड्यांची संख्या वाढविणे हा उपाय पुरेसा नाही; त्या वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने धावतील, याची खात्री करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र ऐन गणेशोत्सवात रेल्वेच्या वेळापत्रकाची अशी वाताहत होत असेल, तर विशेष गाड्यांचे नियोजन नेमके कोणासाठी, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित होत आहे. गणेशोत्सव हा कोकणवासीयांसाठी केवळ सण नाही, तर वर्षभराची आतुरता घेऊन येणारा भावनिक सोहळा आहे. मुंबई, पुणे आणि राज्याच्या विविध भागांतून लाखो चाकरमानी या काळात आपल्या गावाकडे रवाना होतात. अशा वेळी रेल्वेच्या नियोजनातील त्रुटींचा थेट फटका त्यांच्या प्रवासाला बसत असेल, तर ‘गणेशभक्तांची सोय’ या नावाखाली केलेल्या व्यवस्थेचा आढावा घेण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर आली आहे.
गाड्या तासनतास खोळंबत असताना प्रवाशांनी संयम राखायचा आणि प्रशासनाने केवळ विलंबाची माहिती देत राहायची, असेच चित्र कायम राहणार असेल तर गणेशोत्सवातील विशेष रेल्वे व्यवस्थेचा नेमका लाभ कोणाला मिळतो, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. गणरायाच्या स्वागतासाठी निघालेल्या भाविकांना रेल्वेच्या विलंबाची परीक्षा देण्याची वेळ येऊ नये, एवढीच प्रवाशांची अपेक्षा आहे.


