(राजापूर / तुषार पाचलकर)
प्रकाश मनोहर गुरव (रा. तळवडे-वखाडवाडी, कर्जवने) यांचे हातातील दोन तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट (किंमत अंदाजे तीन लाखाच्या आसपास) ९ मे २०२६ रोजी हरवले होते. सकाळी पाचल येथून लग्नसमारंभासाठी भालवली-राजापूरकडे जात असताना राजापूर पेट्रोल पंप परिसरात सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या दरम्यान ब्रेसलेट हरवल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने परिसरात शोध घेतला. मात्र ब्रेसलेट न सापडल्याने त्याच दिवशी सायंकाळी साडेचार वाजता रायपाटण पोलीस दूरक्षेत्र येथे ठाणे अंमलदार श्री. कमलाकर पाटील यांच्याकडे हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली.
दरम्यान, घरी परतल्यानंतर प्रकाश गुरव यांना रायपाटण येथील पोलीस कॉन्स्टेबल रामदास पाटील यांचा फोन आला. ब्रेसलेट सापडल्याची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ रायपाटण पोलीस दूरक्षेत्र गाठून पोलिसांकडून आपले हरवलेले ब्रेसलेट ताब्यात घेतले. यावेळी श्री. पराडकर उपस्थित होते.
पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिल हरिश्चंद्र माळी (वय ३९), पोलीस पाटील, रा. मांजरेवाडी-सौंदळ, ओझर व्यवसाय रिक्षा चालक, यांना सौंदळ ते ओणी प्रवासादरम्यान गोरुळेवाडी फाटा परिसरात सकाळी सुमारे ११.३० वाजता हे ब्रेसलेट सापडले होते.
यानंतर रायपाटण बिटच्या “पोलीस पाटील रायपाटण बिट व्हॉट्सअॅप ग्रुप” वर ठाणे अंमलदार श्री. कमलाकर पाटील यांनी हरवलेल्या ब्रेसलेटबाबत संदेश प्रसारित केला होता. तो संदेश पाहताच अनिल माळी यांनी तातडीने संपर्क साधून ब्रेसलेट सापडल्याची माहिती दिली.
श्री. कमलाकर पाटील यांनी अनिल माळी यांना त्वरित रायपाटण पोलीस दूरक्षेत्र येथे बोलावून घेतले आणि संबंधित ब्रेसलेट ताब्यात घेऊन ते मालक प्रकाश गुरव यांच्या स्वाधीन केले.
यावेळी मनोज प्रकाश गुरव, दिनेश सूर्यकांत गुरव, पोलीस सहायक उपनिरीक्षक कमलाकर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल रामदास पाटील, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील घाडगे आदी उपस्थित होते.
अनिल माळी यांच्या प्रामाणिकपणा आणि इमानदार वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत असून, पोलीस प्रशासन तसेच प्रकाश गुरव यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

