(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यातील लांजा येथे ११ वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी आशितोष अनिल जाधव (वय २०, रा. लांजा) यास रत्नागिरी सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि २२ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अल्पवयीन मुलीवरील या गुन्ह्याला न्यायालयाने गांभीर्याने घेत कठोर शिक्षेचा आदेश दिला.
११ जुलै २०२३ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली होती. शाळा सुटल्यानंतर पीडिता दोन सहाध्यायी मुलांसोबत घरी परतत असताना आरोपी तिच्याजवळ आला. त्याने मुलांना धमकावून वेगळ्या रस्त्याने जाण्यास भाग पाडले. घाबरलेल्या अवस्थेत ती दोन्ही मुले निघून गेल्यानंतर आरोपीने पीडितेचा जबरदस्तीने हात पकडून तिला जवळील शासकीय उपकेंद्राच्या मागील बाजूस ओढत नेले आणि अत्याचार केला. घडलेला सर्व प्रकार कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही त्याने दिली. घरी परतल्यानंतर मुलगी भयभीत अवस्थेत असल्याचे पालकांच्या निदर्शनास आले. नातेवाईकांनी धीर देत चौकशी केल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. यानंतर तिच्या आईने लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६(ए) (बी), ५०४, ५०६ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पॉक्सो) २०१२ अंतर्गत कलम ४, ६, ८, ९ (एम), १० नुसार गुन्हा दाखल केला.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. व्ही. देशमुख यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे ११ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. पीडितेसोबत असलेल्या एका शाळकरी मुलाची साक्षही न्यायालयाने ग्राह्य धरली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी उपलब्ध पुरावे, साक्षी आणि वैद्यकीय अहवालांचा विचार करून आरोपीस जन्मठेप व २२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या खटल्यात सरकार पक्षाची बाजू अत्यंत अभ्यासपूर्ण आणि ठोस पुराव्यांच्या आधारे मांडत ॲड. अनुपमा ठाकूर यांनी न्यायालयाचे लक्ष प्रकरणाच्या गांभीर्याकडे वेधले. अल्पवयीन पीडितेवरील अत्याचारासारख्या संवेदनशील गुन्ह्यात त्यांनी कायद्याच्या तरतुदींचा अचूक आधार घेत प्रभावी युक्तिवाद सादर केला. साक्षीदारांचे सुसंगत परीक्षण, वैद्यकीय पुराव्यांचे नेमके विश्लेषण आणि घटनाक्रमाची साखळी न्यायालयासमोर स्पष्टपणे उभी करत त्यांनी आरोपीविरुद्धची बाजू भक्कम केली. संवेदनशील प्रकरणात न्यायासाठी कटिबद्ध राहून पीडितेला न्याय मिळवून देण्यात ॲड. ठाकूर यांनी बजावलेली भूमिका उल्लेखनीय ठरली आहे.

