(नवी दिल्ली / वृत्तसंस्था)
उत्तर अरबी समुद्रात मंगळवारी सायंकाळी भारतीय नौदलाच्या आघाडीच्या युद्धनौकेची पाकिस्तानी नौदलाच्या ‘पीएनएस हुनैन’ या नौकेशी सौम्य टक्कर झाली होती. भारतीय सूत्रांनुसार, ही घटना ओमानच्या आखातापासून सुमारे १२० नॉटिकल मैल अंतरावर आंतरराष्ट्रीय समुद्रात घडली. या घटनेत पाकिस्तानी नौकेचे नुकसान झाले असून भारतीय युद्धनौका सुरक्षित राहिली आणि नियमित टेहळणी मोहिमेवर पुढे रवाना झाली.
भारतीय सूत्रांच्या माहितीनुसार, ‘पीएनएस हुनैन’ ही पाकिस्तानी नौका वेगाने भारतीय युद्धनौकेच्या जवळ आली आणि तिची समुद्रातील हालचाल असुरक्षित व अव्यावसायिक पद्धतीची होती. त्यातून दोन्ही नौकांची सौम्य धडक झाली. उत्तर अरबी समुद्रात भारतीय नौदलाच्या विनाशिका आणि फ्रिगिट्स गेल्या काही काळापासून तैनात आहेत.
या घटनेवर भारताने बुधवारी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, आंतरराष्ट्रीय समुद्रात घडलेल्या या घटनेत मोठे नुकसान झालेले नाही; मात्र पाकिस्तानी नौदलाच्या नौकेची समुद्रातील हालचाल एप्रिल १९९१ मध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या ‘मिलिटरी एक्सरसाइजेस, मॅन्युव्हर्स अँड ट्रूप मूव्हमेंट्स’संदर्भातील कराराच्या दहाव्या कलमाच्या थेट विरोधात होती.
या कराराच्या अनुषंगाने दोन्ही देशांच्या नौदलाच्या जहाजांनी आंतरराष्ट्रीय समुद्रात एकमेकांपासून किमान तीन नॉटिकल मैल अंतर राखण्याची तरतूद आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संबंधित करारांचे पालन करण्याची गरज भारताने पाकिस्तानला बजावली आहे.
दरम्यान, भारताने नवी दिल्लीतील पाकिस्तानच्या प्रभारी अधिकाऱ्याला समन्स बजावून या घटनेचा औपचारिक निषेध नोंदवला. पाकिस्तान उच्चायुक्तालयातील प्रभारी अधिकारी साद वाराइच यांना परराष्ट्र मंत्रालयाने बोलावले. ही घटना अस्वीकारार्ह असल्याचे स्पष्ट करत भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये आणि दोन्ही देशांतील संबंधित करारांचे योग्य पालन करावे, अशी भूमिका भारताने मांडली.
भारताच्या इस्लामाबादमधील प्रभारी अधिकाऱ्यालाही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे या घटनेबाबत निषेध नोंदवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या घटनेबाबत भारत आणि पाकिस्तानकडून वेगवेगळे दावे करण्यात आले असून, पाकिस्ताननेही भारतीय युद्धनौकेच्या हालचालींवर आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे.


