(ठाणे / शहापूर)
त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन मुंबईकडे परतणाऱ्या जोगेश्वरीतील जैस्वाल कुटुंबाच्या प्रवासावर आटगाव येथे काळाने घाला घातला. मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील आटगाव परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला इर्टिगा कारने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत आणि जखमी सर्वजण मुंबईतील जोगेश्वरी भागातील रहिवासी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी येथील जैस्वाल कुटुंब इर्टिगा कारमधून त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून मुंबईच्या दिशेने परतत असताना आटगाव परिसरात कारवरील चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली.
आटगावजवळ महामार्गाजवळच दोन वर्षापूर्वी ट्रक जळाला होता. तो ट्रक अजूनही रस्त्याच्या कडेला तसाच उभा आहे. याच ट्रकवर जाऊन एर्टिगा कार जाऊन आदळली. धडकेची तीव्रता एवढी होती की कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. ब्रेक फेल होऊन स्टेअरिंग लॉक झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले असावे असा प्राथमिक अंदाज आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अपघाताबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
या भीषण अपघातात श्रीराम जैस्वाल, आयुष जैस्वाल, लाडो जैस्वाल आणि सुरज जैस्वाल यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताच्या घटनेत अवघ्या 1 वर्षीय आणि 8 वर्षीय चिमुकल्यांचा समावेश आहे. या दुर्घटनेत सुभी जैस्वाल, शिवम जैस्वाल, हाशिक जैस्वाल, सुनीता जैस्वाल, राधिका जैस्वाल आणि सतीश जैस्वाल हे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


