(चिपळूण / रत्नागिरी)
मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालवून रस्त्यावरील इतरांच्या जीविताला धोका निर्माण केल्याच्या आरोपावरून अलोरे-शिरगाव पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात कारवाई केली. शिरगाव ते पेढांबे मार्गावरील शिरगाव बाजारपेठ चौकात शनिवारी (३ ऑक्टोबर) रात्री सुमारे ११.४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
बालकनाथ रामबदन पांडे (वय २५, रा. सुलतानपूर, उत्तर प्रदेश) असे संबंधित ट्रकचालकाचे नाव आहे. तो आपल्या ताब्यातील एमएच ०४ एलक्यू ००५० क्रमांकाचा ट्रक मद्याच्या नशेत चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दिनेश आनंदा कोटकर (वय ४६) यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी चालकाविरोधात मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविणे हे केवळ वाहतूक नियमांचे उल्लंघन नसून रस्त्यावरील अन्य वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठीही गंभीर धोका ठरू शकते. त्यामुळे अशा प्रकारांविरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.


