(रत्नागिरी / वार्ताहर)
जिल्हा हिवताप कार्यालय, रत्नागिरी आणि राष्ट्रीय कीटकजन्य रोग निर्मूलन कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या सहकार्याने रत्नागिरी शहर बसस्थानक परिसरात कीटकजन्य आजारांविषयी जनजागृती अभियान उत्साहात राबविण्यात आले.
या अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांनी प्रभावी पथनाट्य सादर करून डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आदी कीटकजन्य आजारांपासून बचावासाठी आवश्यक उपाययोजनांचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवला. याशिवाय पत्रकांचे वाटप, गटचर्चा, जनजागृतीपर पोस्टर्स लावणे आदी उपक्रमही राबविण्यात आले.
यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव, आरोग्य पर्यवेक्षक एल. जी. पुजारी व आर. एस. जाधव, कीटकसमहारक व्ही. एस. ढवळे व एस. आर. शेलार, आरोग्य निरीक्षक एस. जी. राणे व डी. व्ही. गुरव, आरोग्यसेवक एम. एम. साळवी, एन. एन. डंबे, एस. जे. ढेकणे, एस. एस. बिरांजे, क्षेत्रीय कर्मचारी व्ही. व्ही. सावंत तसेच गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्रा. सचिन संगारे आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.
या जनजागृती उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, कीटकजन्य आजारांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे उपस्थितांनी यावेळी सांगितले.

