(लांजा)
साटवली प्राथमिक आरोग्य केंद्रात घडलेली एक संतापजनक आणि मन हेलावणारी घटना समोर आली असून, उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या विजय केरू भोवड (वय ४०) यांचा मृतदेह रुग्णालयात न नेता दोन तास रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच झाकून ठेवण्यात आला. या प्रकारामुळे साटवलीसह संपूर्ण लांजा तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
दि. ३ मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भोवड यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना साटवली आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेहमीप्रमाणे बेडवर तपासणी करण्याऐवजी त्यांची तपासणी रुग्णालयाच्या आवारातच करण्यात आली आणि त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर, मृतदेह रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच तब्बल दोन तास झाकून ठेवण्यात आला, ही बाब केवळ निष्काळजीपणाच नव्हे, तर मानवतेच्या मूलभूत मूल्यांना तडा देणारी आहे.
सायंकाळी साडेसात वाजता ‘जिजाऊ’ संस्थेच्या खाजगी रुग्णवाहिकेतून मृतदेह शवविच्छेदनासाठी लांजा येथे हलविण्यात आला. विशेष म्हणजे, साटवली आरोग्य केंद्राकडे स्वतःची रुग्णवाहिका असतानाही खासगी वाहनाचा अवलंब का करण्यात आला, हा प्रश्नही आता नागरिक विचारू लागले आहेत.
या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणेतील बेपर्वाई, निष्काळजीपणा आणि व्यवस्थेतील गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. संतप्त ग्रामस्थांनी या अमानवी कृत्याची चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. परगे यांनी देखील या प्रकाराला “गंभीर” आणि “चुकीचा” असल्याचे मान्य करत संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना समज देण्यात आल्याचे सांगितले आहे. मात्र, या प्रकारामुळे साटवली आरोग्य केंद्रातील व्यवस्थापनावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. “माणूस मरणोत्तरही सन्मानास पात्र असतो, पण इथे माणुसकीचाच अंत झालाय” अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.