(मुंबई/ वृत्तसंस्था)
महाराष्ट्रातील लाखो महिला प्रवाशांची सुरक्षितता, आरोग्य आणि सन्मान लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील एसटी बसस्थानकांवर १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडसोबत सामंजस्य करार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते.
महिलांना, विशेषतः स्तनदा मातांना, प्रवासादरम्यान बाळाची काळजी घेण्यासाठी स्वच्छ, सुरक्षित आणि खासगी जागा उपलब्ध करून देणे हा ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यामागील उद्देश आहे. एसटीच्या बसस्थानकांवर मातृत्वासाठी आवश्यक संवेदनशीलता आणि सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
या प्रकल्पासाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेड आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात सीएसआर उपक्रमांतर्गत सहकार्य करणार आहे. सामंजस्य करारानुसार राज्यातील एसटी बसस्थानकांवर अंदाजे ३ मीटर × ३ मीटर आकाराचे प्री-फॅब्रिकेटेड ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यात येणार आहेत. या कक्षांमध्ये मातांना स्तनपानासह बाळाची निगा राखण्यासाठी सुरक्षित आणि खासगी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासोबत आवश्यक फर्निचर, फिक्स्चर, अंतर्गत वायरिंग, विद्युतीकरण तसेच इलेक्ट्रॉनिक साहित्याचाही प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे.
सामंजस्य करारानुसार तीन आर्थिक वर्षांत एकूण १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षात ५० कक्ष, २०२७-२८ मध्ये ५० कक्ष आणि २०२८-२९ मध्ये २५ कक्ष उभारण्यात येणार आहेत. सीएसआर धोरण, उपलब्ध जागा आणि स्थानिक गरजेनुसार या संख्येत आवश्यकतेनुसार बदल करण्याची तरतूदही करारात करण्यात आली आहे.
या प्रकल्पासाठी एसटी महामंडळाकडून सुमारे ५ मीटर × ५ मीटर जागा उपलब्ध करून देणे, आवश्यक वीज, पाणी आणि स्थापनेसाठी सहकार्य करणे तसेच आवश्यक शासकीय परवानग्या मिळविणे अपेक्षित आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर साहित्य व सुविधा महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात येतील. त्यानंतर कक्षांचे संचालन, सुरक्षा, दुरुस्ती, देखभाल आणि देखरेख करण्याची संपूर्ण जबाबदारी एसटीची राहणार आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी एसटीकडून कोणतेही आर्थिक योगदान राहणार नसून, टोयोटा किर्लोस्करच्या सीएसआर उपक्रमातून हा प्रकल्प राबविला जाणार आहे.
एसटी ही केवळ प्रवासाची सेवा नसून महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाशी जोडलेली लोकवाहिनी आहे. ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत दररोज लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटीच्या बसस्थानकांवर स्तनदा मातांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध झाल्याने महिला प्रवाशांच्या सन्मानात आणि प्रवासाच्या अनुभवात सकारात्मक भर पडणार आहे. ‘हिरकणी कक्ष’ हा केवळ एक सुविधा प्रकल्प नसून मातृत्वाचा सन्मान, महिलांच्या गरजांची जाणीव आणि प्रवासी-केंद्रित एसटी व्यवस्थेच्या दिशेने टाकलेले संवेदनशील पाऊल ठरणार आहे, असे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
दरम्यान, एसटीच्या सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी एनसीएमसी (NCMC) कार्डचे ‘टॉपअप’ रिचार्ज थेट एसटीच्या वाहकांकडूनच करून घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या सुविधेमुळे कार्डमधील बॅलन्स संपल्याने सवलतीपासून वंचित राहण्याची वेळ, रिचार्जसाठी डेपोंमध्ये लागणाऱ्या रांगा आणि प्रवाशांची होणारी धावपळ कमी होणार आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळाच्या या सुविधेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
एसटी महामंडळाने १ सप्टेंबरपासून महिला आणि ६५ ते ७५ या वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासातील सवलतीचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य केले होते. मात्र, कार्डमध्ये पुरेसा बॅलन्स नसल्यास प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. रिचार्ज करण्यासाठी डेपो किंवा संबंधित केंद्रांवर जावे लागत असल्याने ऐनवेळी सवलतीऐवजी पूर्ण तिकीट काढण्याची पाळी प्रवाशांवर येत होती.
काही ठिकाणी सुटे पैसे नसल्याने प्रवाशांना बसमधून खाली उतरवण्याचे प्रकारही घडले होते. ही गैरसोय लक्षात घेऊन महामंडळाने आता वाहकांकडेच ‘टॉपअप’ची सुविधा सोपवली आहे. त्यामुळे प्रवासादरम्यानच बसमध्ये आवश्यकतेनुसार रक्कम भरता येणार असून स्वतंत्रपणे रिचार्ज करण्यासाठी पळापळ करावी लागणार नाही. ऐन गणेशोत्सवाच्या काळात ही टॉपअप सुविधा सुरू झाल्यामुळे गेल्या २ आठवड्यांपासून प्रवाशांना सहन करावा लागणारा नाहक मनस्ताप आता थांबला आहे.
गणेशोत्सवात एसटी गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होते. अशा वेळी रिचार्जच्या अडचणींमुळे मोठा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र, ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे प्रवासातील अडथळे दूर होऊन महामंडळाच्या महसुलातही मोठी वाढ होणार आहे.
वाहकांकडून मिळणाऱ्या सुविधेबरोबरच प्रवाशांना ‘भीम’ (BHIM) ॲपद्वारेही एनसीएमसी कार्ड टॉपअप करता येणार आहे. कार्डच्या मागील बाजूस दिलेल्या ‘क्यूआर’ (QR) कोडचा वापर करून ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. त्यामुळे डिजिटल पेमेंटचा वापर करणाऱ्या प्रवाशांना घरबसल्या कार्डमध्ये पैसे लोड करणे अधिक सोपे झाले आहे.
एनसीएमसी कार्डमधील बॅलन्स संपल्यानंतर रिचार्ज करण्यासाठी डेपो किंवा इतर केंद्रांवर जावे लागत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. आता थेट वाहकांकडूनच ‘टॉपअप’ सुविधा मिळाल्याने ही धावपळ थांबणार आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवासादरम्यानच आवश्यक रक्कम भरता येणार असल्याने त्यांना सवलतीचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे.


