(रत्नागिरी)
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी वेळेआधी पोहोचण्याच्या घाईत असताना निवळी-बावनदी येथे शिक्षकांच्या गाडीला झालेल्या अपघाताने संपूर्ण शिक्षक वर्ग हादरला आहे. या अपघातास शिक्षण प्रशासनाची कठोर आणि मानवतेच्या पलीकडची धोरणे कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप कोकण विभागीय शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सागर पाटील यांनी केला आहे.
“प्रशिक्षणासाठी अवघ्या पाच मिनिटांचा उशीर झाला तरी शिक्षकांना बाहेर काढले जाते. त्यामुळे शिक्षकांवर मानसिक दबाव येतो आणि त्यातूनच अशा दुर्दैवी घटना घडतात,” असे पाटील म्हणाले. तालुकास्तरीय प्रशिक्षणासाठी शिक्षकांनी वारंवार विनंती केली, मात्र प्रशासनाने ठाम नकार दिला. परिणामी शिक्षकांना लांब पल्ल्याचा प्रवास खासगी वाहनांनी करावा लागतो, आणि त्यातूनच अपघात त्यातूनच अशा अपघाताला सामोरे जावे लागले.
प्रशिक्षणाच्या प्रत्येक सत्रानंतर घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षांमुळे शिक्षकांवर अविश्वास दाखविला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. “प्रशिक्षण उपस्थितीपत्रकावर सही करून शिक्षक दांडी मारतात, असा चुकीचा समज काही अधिकाऱ्यांनी करून घेतला आहे. यामुळे त्यांच्यावर अनावश्यक बंधनं लादली जात आहेत,” असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
२ जूनपासूनच वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण सुरू करण्याच्या परीक्षे परिषदेच्या आदेशामुळे राज्यातील शेकडो शिक्षकांचा डीएसएम (शालेय व्यवस्थापन पदविका) परीक्षेचा शेवटचा पेपर चुकला. “प्रशिक्षण घ्या की परीक्षा द्या, असा अजब सल्ला अधिकाऱ्यांकडून देण्यात आला. हा शिक्षकांवरील अन्याय आहे,” असे पाटील यांनी संतप्तपणे सांगितले.
जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ हटवा; अध्यापक संघाची मागणी
“ही वेळ शिक्षकांच्या जीवावर बेतणारी आहे. प्रशासनाच्या अडमुठेपणामुळे शिक्षकांचे जीवन धोक्यात आले आहे. शिक्षकांवर अविश्वास दाखविणाऱ्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना तात्काळ हटविण्यात यावे,” अशी ठाम मागणी कोकण विभागीय शिक्षक लोकशाही आघाडी व रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने शासनाकडे केली आहे.

