(कोल्हापूर / वृत्तसंस्था)
नांदणी मठाकडील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीच्या घरवापसीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. गुजरातमधील वनताराकडे जाऊन सव्वा वर्ष झाल्यानंतर माधुरीला पुन्हा नांदणी मठाकडे आणण्यास उच्चस्तरीय समितीने हिरवा कंदील दाखवला आहे. बुधवारी झालेल्या ऑनलाईन बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मठाचे वकील मनोज पाटील यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आणि गुरुवारी सायंकाळी वनतारामधून माधुरी हत्तीणीचा ताबा मिळवला.
माधुरीला तातडीने लोकांमध्ये मिसळणे वैद्यकीयदृष्ट्या काहीसे अडचणीचे असल्याने तिची घरवापसी टप्प्याटप्प्याने केली जात आहे. कालपासून तिचा नांदणीकडे परतीचा प्रवास सुरू झाला आहे, अशी माहिती मठाचे पदाधिकारी सागर शंभुशेटे यांनी दिली.
माधुरीच्या परतीसाठी महाराष्ट्र शासन, नांदणी मठाचे वकील तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी सातत्याने पाठपुरावा करत होते. त्यांच्या प्रयत्नांना आता यश आले आहे. उच्चस्तरीय समितीच्या अटींची पूर्तता करण्यासाठी नांदणी मठात माधुरीसाठी अद्ययावत आणि जागतिक दर्जाच्या सुविधा उभारण्यात आल्या आहेत.
माधुरीसाठी उभारण्यात आलेल्या पुनर्वसन केंद्राचे अंदाजपत्रक सुमारे १२ कोटी रुपये आहे. या केंद्रात हत्तींसाठी हायड्रोथेरपीसाठी विशेष तलाव, उत्तम निवारा आणि आवश्यक आधुनिक सुविधा करण्यात आल्या आहेत. उच्चस्तरीय समितीने या सुविधांची बारकाईने पाहणी केली. तसेच माधुरीचा आरोग्य अहवाल समाधानकारक असल्याचे आढळल्यानंतर तिला नांदणी मठात परत पाठवण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला, अशी माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
गेल्या महिन्यात माधुरीच्या नव्या निवासस्थानाचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. तिच्या निवासस्थानी रबरी मॅटिंग, एक्झॉस्ट फॅन आणि स्प्रिंकलरची सुविधा करण्यात आली आहे. प्रथमोपचारासाठी स्वतंत्र इमारतही उभारण्यात आली आहे. उच्चस्तरीय समिती आणि वनताराकडून देण्यात आलेल्या सूचनांनुसार आवश्यक सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
माधुरीने लवकरात लवकर नांदणीत परत यावे, अशी ग्रामस्थांची अनेक दिवसांपासून मागणी होती. ग्रामस्थ रामगोंडा अण्णा पाटील यांनीही माधुरीच्या घरवापसीची अपेक्षा व्यक्त केली होती. यासाठी लाक्षणिक उपोषणही करण्यात आले होते.
येत्या १३ सप्टेंबरला परमपूज्य प्रथमाचार्य श्री शांतीसागरजी महाराज यांची ७१ वी जयंती प्रथमच नांदणी येथे मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या भव्य सोहळ्यात लाडकी माधुरी हत्तीण उपस्थित असावी, अशी ग्रामस्थांची भावना होती. माधुरीच्या पुनरागमनासाठी संबंधित यंत्रणांनी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली होती.
जिनसेन स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामींचा नांदणी मठ महाराष्ट्र, कर्नाटक आणि सीमाभागातील सुमारे ७५० मठांचे प्रतिनिधित्व करतो. या मठाचा ऐतिहासिक वारसा लक्षात घेऊन माधुरीच्या घरवापसीसाठी विविध गावांमध्ये डिजिटल फलक उभारून जनजागृती करण्यात आली होती.
काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातल्या नांदणी मठातील माधुरी हत्तीणीला गुजरातच्या वनतारामध्ये सोपवण्यात आलं होतं. नांदणी मठात माधुरी हत्तीणीसाठी आवश्यक असलेल्या सोई सुविधान नसल्याचं कारण त्यासाठी देण्यात आलं होतं. परंतु माधुरी हत्तीणीला गुजरातच्या वनतारामध्ये सोपवण्यास स्थानिकांचा प्रचंड विरोध होता. मात्र तरी देखील या हत्तीणीला वनतारामध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा या हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. माधुरी हत्तीणीबाबतची उच्चस्तरीय समिती समोरील सुनावणी पूर्ण झाली आहे.
आता वनतारामधून माधुरीचा ताबा मिळाल्याने तिच्या नांदणी मठातील पुनरागमनाचा मार्ग प्रत्यक्षात सुरू झाला आहे. त्यामुळे माधुरीच्या स्वागतासाठी नांदणीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, तिच्या आगमनाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.


