(दापोली)
दापोली तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांकडून होणारी बेदरकार वाहनचालकाची प्रकरणे पुन्हा समोर येत आहेत. आंजर्ले-सावणे येथे मंगळवारी गाडी बुडाल्याची घटना ताजी असतानाच, बुधवारी सायंकाळी सालदुरे खाडी परिसरात स्टंटबाजी करताना पुणे येथील पर्यटकांची कार वाळू मिश्रित चिखलात अडकली. सुदैवाने ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, सालदुरे खाडी परिसरात काही पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर कार घेऊन स्टंट करत होते. यावेळी भरतीपूर्वीच गाडी वाळू मिश्रित चिखलात खोलवर अडकली. गाडीत लहान मुले, महिला आणि पुरुष प्रवासी होते. घटना लक्षात येताच सालदुरे गावातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
ग्रामस्थांनी सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढून गाडी बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. जवळपास तासभर मेहनत घेत जीवाची पर्वा न करता अखेर भरती सुरू होण्यापूर्वीच गाडी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश मिळवले. या मदतकार्यात निवेदन शेवडे, रुपेश शेवडे आणि विपुल शेवडे यांच्यासह ग्रामस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या तत्परतेबद्दल पर्यटकांनीही त्यांचे कौतुक केले.
दरम्यान, अंजर्ले-हरणे-मुरुड किनारपट्टी भागात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याची चिंता स्थानिक नागरिक आणि पर्यटनप्रेमींनी व्यक्त केली आहे. पर्यटकांकडून समुद्रकिनाऱ्यावर बेदरकारपणे गाड्या चालविल्या जात असल्याने केवळ स्वतःच्या जीवाला नव्हे, तर किनाऱ्यावर फिरणाऱ्या इतर पर्यटक आणि ग्रामस्थांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होत आहे.
यापूर्वीही हा मुद्दा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला होता. त्यानंतर काही काळ किनाऱ्यावर वाहनांना बंदी घालण्यात आली होती. मात्र, पुन्हा नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याने अशा घटना वाढत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. समुद्रकिनाऱ्यांवरील बेजबाबदार वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी आणि किनारपट्टी परिसरात वाहनांना नियंत्रणात ठेवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता स्थानिक नागरिक आणि पर्यटनप्रेमींकडून जोर धरू लागली आहे.

