(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या रस्त्यांचा दर्जा किती? हा प्रश्न वारंवार उपस्थित होत असताना आता बायपास रोडचे रस्त्यांच्या समस्या निर्माण होत असल्याने महामार्गाचा विकास हा पुन्हा एकदा लक्ष वेधून घेत आहे. खेडशी ते कारवांचीवाडी बायपास मार्गाचे काम पूर्ण होऊन वर्षही उलटले नसताना रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे नव्या बायपासची अवस्था खराब होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र आहे.
मिऱ्या नागपूर महामार्गाच्या कामात संबंधित रवी इन्फ्रा बिल्ड कंपनीच्या कामाच्या दर्जाबाबत यापूर्वीही प्रश्न उपस्थित झाले असताना आता बायपास रस्त्यावरील खड्ड्यांनी पुन्हा कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. विशेष म्हणजे, रस्त्याला वर्षभराचा कालावधीही पूर्ण झालेला नसताना डांबराचा थर उखडून खडी रस्त्यावर पसरत असल्याने बांधकामाची गुणवत्ता नेमकी कोणत्या निकषांवर तपासली गेली, असा सवाल उपस्थित होत आहे.
खेडशी-कारवांचीवाडी बायपासवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून काही ठिकाणी डांबराचा थर अक्षरशः गायब झाल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर पसरलेली खडी वाहनांच्या टायरखाली उडत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यांची खोली लक्षात येत नसल्याने वाहनचालकांना अचानक दणका बसत आहे. एकीकडे नवीन बायपासमुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होईल, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात नव्या रस्त्याचीच खड्ड्यांमुळे परीक्षा सुरू झाली आहे. त्यामुळे रस्ता बांधताना वापरण्यात आलेले साहित्य, डांबरीकरणाची प्रक्रिया, थरांची जाडी आणि कामाच्या गुणवत्तेची तपासणी झाली होती का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
काँक्रिटीकरणाच्या मार्गिकाही फुटल्या
महामार्गावरील काँक्रिटीकरणाच्या मार्गिकांनाही ठिकठिकाणी तडे जाऊन त्या फुटत असल्याचे चित्र आहे. त्यातच बायपास रस्त्यावरील डांबर उखडू लागल्याने ‘नवा रस्ता, जुनीच अवस्था’ अशी परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो; मात्र वर्षभराचा कालावधीही पूर्ण होण्याआधी रस्त्यावर खड्डे पडत असतील, तर करदात्यांच्या पैशांचा हा नेमका उपयोग कशासाठी? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दुचाकीस्वारांसाठी खड्डे ठरताहेत धोक्याचे
पावसाची एखादी सर आली की खड्ड्यांमध्ये पाणी साचते. पाण्याखाली खड्ड्याची खोली आणि आकाराचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वारांना अचानक वाहनाचा तोल जाण्याची शक्यता आहे. रस्त्यावर पसरलेली खडीही दुचाकी घसरून अपघात होण्यास कारणीभूत ठरू शकते. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर काही महिन्यांतच दुरुस्तीची वेळ येत असेल, तर बांधकामाच्या गुणवत्तेची जबाबदारी कोणाची? काम करणारा ठेकेदार, कामाची देखरेख करणारी यंत्रणा की दर्जा तपासणारे अधिकारी? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.


