(चिपळूण)
शहरातील पाग भागात राहाणाऱ्या एका महिलेच्या ओळखीचा फायदा घेत गेली पाच वर्षे शहरातील विविध लॉजवर नेऊन वारंवार शारीरिक संबंध प्रस्तापित केले तसेच फोटो व व्हिडीओ काढले. ते व्हायरल करेन, अशी धमकी देत पैसे व दागिने घेऊन आयफोन घेण्यासाठी पीडित महिलेच्या नावाने एका बँकेतून कर्ज काढले. आपले पैसे, दागिने व फोन परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी उक्ताड बायपास येथील एकाविरूद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात अत्याचार करून फसवणूक केल्याचा शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना नोव्हेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत घडली.
३६ वर्षीय पीडित महिलेने चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानुसार नोव्हेंबर २०१९ कोविड काळात संशयित आरोपी एजाज मुशताक माखजनकर (रा. उक्ताड, बायपास, चिपळूण) हा फोनद्वारे फिर्यादीच्या संपर्कात आला. पुढे तो व्हिडीओ क्रॉप करू लागल्याने मैत्रीचे संबंध झाले. दरम्यान, त्यांच्यात शरीरसंबंध आले. त्याचे त्याने व्हिडीओ व फोटो काढले. हे लक्षात आल्यावर त्याच्यापासून लांब होण्याचा प्रयत्न केला असता त्याने ते व्हायरल करण्याची धमकी देत शहरातील विविध लॉजवर नेऊन तसेच फिर्यादीच्या घरी येऊन पाच वर्षे लैंगिक अत्याचार केले.
हे सुरू असताना नोव्हेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत त्याने एक लाख २० हजार रुपये रोख व गुगल पे द्वारे घेतले व आपले ७ ते ८ तोळ्याचे दागिने घेतले. ते अद्याप आपणास परत केले नाहीत. शिवाय २०२३ मध्ये एका बँकेतून कर्ज काढून फिर्यादीच्या नावे आयफोन खरेदी केला. पुढे फेब्रुवारी २०२४ मध्ये आपण फोनचा हप्ता थकल्याने तो परत मागितला असता मी तुझी वाट लावेन, अशी धमकी दिली. त्यानंतर सातत्याने तो धमक्या देत राहिल्याने कंटाळून फिर्यादीने पतीला घडलेला सर्व प्रकार सांगितला. या तक्रारीवरून पोलिसांनी एजाज माखजनकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.