(खेड / प्रतिनिधी)
शिक्षक दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने खेड तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १६ शिक्षकांचा ‘आदर्श गुरुवर्य पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. एम. आय. हजवानी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, खेड येथे हा पुरस्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता संस्कार, सामाजिक बांधिलकी, शिस्त, सर्जनशीलता आणि जीवनमूल्यांची रुजवण करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याची या पुरस्काराच्या माध्यमातून दखल घेण्यात आली. खेड तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमधील एकूण १६ शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये एम. आय. बी. गर्ल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, खेडचे अल्ताफ मुसा करबेलकर, एम. आय. हजवानी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या मेहजबीन परवेज महाडिक, ज्ञानदीप विद्या मंदिर भडगावचे विनोद सुधाकर टेंबे, हाजी एस. एम. मुकादम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे हसनमियां अब्दुल समद रिफाई आणि एल. पी. इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे रामचंद्र विठ्ठल मसेकर यांचा समावेश आहे.
तसेच नवभारत हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, भरणेचे विलास सदानंद बेंद्रे, छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल, जामगेचे आनंद सोमय्या हिरेमठ, श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, खेडचे विवेकानंद गोविंद कांबळे, एस. एम. इंग्लिश मीडियम स्कूल, दस्तुरीचे सागर प्रमोद मोरे आणि एल. टी. टी. इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या शितल सलील जागुष्टे यांचाही पुरस्काराने गौरव करण्यात आला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साखरोळी-मोरेवाडीचे राजेश रघुनाथ भागणे, जिल्हा परिषद शाळा आंबवलीच्या रसिका रमेश रेवाळे, श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल, वेरळच्या भक्ती काशिनाथ घडशी, रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, खेडचे बाळू दत्तात्रय राऊत, ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल, मोरवंडे-बोरजचे प्रतिक परशुराम पवार आणि विश्वनाथ विद्यालय, लवेलच्या स्मिता प्रकाश सरदेसाई यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
लायन्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतानाच शिक्षकी पेशात उल्लेखनीय योगदान देणारे लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष ला. सुरेश चिकणे, विद्यमान सचिव ला. उत्तम कांबळे आणि माजी खजिनदार ला. अनिल मोरे यांनाही लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने विशेष ‘आदर्श गुरुवर्य’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराचे पुरस्कर्ते ला. सुरेश चिकणे, माजी चेअरमन, माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित, रत्नागिरी तसेच ला. उत्तम कांबळे, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती यांचाही क्लबच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले. समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, ज्ञानदानासोबतच संस्कार, सामाजिक जाणीव आणि नवनवीन अध्यापन पद्धतींच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देतात, असे मान्यवरांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक निष्ठेने व समर्पणाने देत असलेले योगदान समाजाच्या भविष्यासाठी मोलाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘शिक्षक हा समाजाचा आदर्श दीपस्तंभ असून, त्याच्या ज्ञान आणि संस्कारांमुळे सक्षम पिढी घडते,’ असा गौरवोद्गार यावेळी व्यक्त करण्यात आला. शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करणारा लायन्स क्लबचा हा उपक्रम शिक्षक, पालक आणि शिक्षणप्रेमींसाठी कौतुकाचा विषय ठरला.
कार्यक्रमाला ला. पंकज भाई शहा, चेअरमन, अण्णासाहेब बेहरे टेक्निकल इन्स्टिट्यूट, खेड, शमसभाई मुकादम, अध्यक्ष, अंजुमन ए तालीम शिक्षण संस्था, खेड, ला. हनीफ भाई घनसार, सचिव, अंजुमन ए तालीम शिक्षण संस्था, खेड, ला. मिलिंद तलाठी, सदस्य, सहजीवन शिक्षण संस्था, खेड, ला. प्रफुल्ल मोरे, शालेय समिती सदस्य, कनिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालय तळे, माजी प्रांतपाल ला. वीरेंद्र चिखले, एम. आय. हजवानी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. तिसेकर, एस. एम. इंग्लिश मीडियम स्कूल दस्तुरीचे चेअरमन श्री. नाडकर, लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे, महेंद्र शिरगावकर, ला. ज्ञानेश्वर मर्कड, ला. विवेक कदम, माजी अध्यक्ष ला. शंकर पार्ट, ला. विनोद मोरे यांच्यासह पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे कुटुंबीय आणि मोठ्या संख्येने शिक्षणप्रेमी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला. सुरेश चिकणे आणि ला. उत्तम कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ला. अनिल मोरे यांनी केले.


