(राजापूर / तुषार पाचलकर)
युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावर लागू करण्यात आलेले तात्पुरते निर्बंध संपूर्ण कोकणातील ग्रामीण भागासाठी शिथिल करण्यात आले आहेत. आता दोन रिफिल सिलेंडरच्या बुकिंगमधील किमान कालावधी ४५ दिवसांवरून २५ दिवस करण्यात आला आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील घरगुती एलपीजी ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती आमदार श्री प्रमोद जठार यांनी दिली.
एलपीजी सिलेंडरच्या बुकिंगमध्ये ४५ दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आल्याने ग्रामीण भागातील ग्राहकांना स्वयंपाकाच्या इंधनासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः संयुक्त कुटुंब पद्धती, घरातील अधिक सदस्यसंख्या आणि ग्रामीण भागातील अन्य व्यावहारिक परिस्थिती लक्षात घेता एका सिलेंडरवर ४५ दिवसांचा कालावधी पूर्ण करणे अनेक कुटुंबांसाठी कठीण ठरत होते.
आगामी गणेशोत्सवाच्या काळात कोकणातील ग्रामीण भागात चाकरमानी तसेच कुटुंबीय मोठ्या संख्येने आपल्या गावी येतात. त्यामुळे या कालावधीत घरगुती एलपीजी सिलेंडरची मागणी वाढण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन आमदार श्री प्रमोद जठार यांनी संबंधित प्रशासन, जिल्हाधिकारी, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय तसेच तेल विपणन कंपन्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी एलपीजी सिलेंडर बुकिंगवरील निर्बंध शिथिल करण्याची मागणी त्यांनी केली होती.
या पाठपुराव्यानंतर दोन रिफिल सिलेंडरच्या बुकिंगमधील किमान कालावधी ४५ दिवसांवरून २५ दिवस करण्यात आला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील हजारो ग्रामीण एलपीजी ग्राहकांना दिलासा मिळणार असून स्वयंपाकाच्या इंधनाची उपलब्धता अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.
आमदार श्री प्रमोद जठार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय झाल्याने कोकणातील ग्रामीण जनतेला दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सवाच्या काळात वाढणारी एलपीजीची मागणी पूर्ण करण्यासाठी या निर्णयाची मदत होणार आहे.


