(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या आदेशानुसार आणि आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे विकास आराखड्यातील अपूर्ण आणि रखडलेल्या विकासकामांचा नुकताच आढावा घेण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करत प्रलंबित कामांची माहिती घेतली.
या पाहणीवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजीत पाटील, एमजीपीचे कार्यकारी अभियंता नांजप्पा, जिल्हा परिषद सदस्य राजू साळवी, बांधकाम विभागाचे उपअभियंता पवळ यांच्यासह गणपतीपुळे येथील पर्यटन व्यावसायिक रवींद्र ठावरे, मयू केदार, कल्पेश सुर्वे, राज देवरुखकर, अविनाश माने, महेश चव्हाण, विश्वनाथ पालकर, उमेश भणसारी आदी उपस्थित होते.
गणपतीपुळे विकास आराखड्यातील ज्या कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही तसेच जी कामे अपूर्ण आहेत, त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून ती तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. अपूर्ण कामांना येत्या चार दिवसांत सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती यावेळी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. याशिवाय गणपतीपुळे परिसरातील रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.
गणपतीपुळे हे महत्त्वाचे पर्यटनस्थळ असल्याने विकास आराखड्यातील कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे रखडलेल्या कामांना पुन्हा गती मिळण्याची चिन्हे दिसत असल्याने ग्रामस्थ आणि पर्यटन व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. विकासकामांना चालना मिळाल्याबद्दल गणपतीपुळे ग्रामस्थ आणि पर्यटन व्यावसायिकांनी पालकमंत्री डॉ. उदय सामंत तसेच आमदार किरण (भैय्या) सामंत यांचे आभार मानले आहेत.


