(गणपतीपुळे / वैभव पवार)
जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपतीपुळे येथील समुद्रकिनारा तब्बल ६० दिवस बंद राहिल्यानंतर सुरू करण्यात आला होता. मात्र, बीच सुरू होऊन अवघे दहा दिवस झाले असतानाच ३ सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार गणपतीपुळे ग्रामपंचायतीने समुद्रकिनारा पुन्हा बंद केला. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटन व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी व संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
या निर्णयाविरोधात अनेक ग्रामस्थ आणि पर्यटन व्यावसायिक आक्रमक झाले. सर्वांनी एकत्र येत रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेण्याचे ठरविले. याबाबत जिल्हा परिषद सदस्य राजू साळवी यांच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी, ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी रत्नागिरी येथे पालकमंत्री उदय सामंत, आमदार भैया सामंत आणि जिल्हाधिकारी अनुज जिंदल यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बैठक घेण्यात आली.
या बैठकीत संबंधित ग्रामस्थ आणि पर्यटन व्यावसायिकांनी गणपतीपुळे बीच पुन्हा सुरू करण्याची विनंती पालकमंत्र्यांकडे केली. तसेच समुद्राच्या धोकादायक स्थितीबाबतची वस्तुस्थितीही त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे सहा जीव रक्षक दोन सत्रांत कार्यरत असून, त्यांच्या जोडीला जयगड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेले होमगार्डही तैनात असल्याची माहिती देण्यात आली. पर्यटकांना समुद्राबाबत योग्य त्या सूचना दिल्या जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
ग्रामस्थ आणि पर्यटन व्यावसायिकांकडून मांडण्यात आलेली वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा प्रशासनाला गणपतीपुळे बीच तात्काळ पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले. तसेच याबाबत गणपतीपुळे ग्रामपंचायतीला कळविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार गणपतीपुळे ग्रामपंचायतीने ५ सप्टेंबरपासून समुद्रकिनारा पर्यटकांसाठी पुन्हा खुला केला आहे. बीच सुरू करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य राजू साळवी यांच्यासमवेत गणपतीपुळे येथील माजी उपसरपंच मयूर केदार, माजी सरपंच महेश ठावरे, कल्पेश सुर्वे, रवी ठावरे, अविनाश माने, उमेश भणसारी, विश्वनाथ पालकर, बंड्या घाणेकर, मंगेश गोताड, किशोर गुरव आदींनी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन बीच सुरू करण्याची विनंती केली होती. ही विनंती पालकमंत्र्यांनी तात्काळ मान्य केली.
यावेळी आमदार किरण (भैया) सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि तालुकाप्रमुख बंड्या साळवी उपस्थित होते. पालकमंत्री उदय सामंत यांनी गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता राखण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
गणपतीपुळे बीच पुन्हा सुरू झाल्याने स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटन व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, बीच सुरू करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांचे ग्रामस्थ आणि पर्यटन व्यावसायिकांनी विशेष आभार मानले आहेत.

