( खेड / वार्ताहर )
तालुक्यातील पन्हाळजे दर्गा जेटी परिसरातील खाडीच्या पाण्यात ५७ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना १८ ऑक्टोबर रोजी समोर आली. किशोर हरी मेढेकर (वय ५७, व्यवसाय मेंढीपालन, रा. पन्हाळजे भोईवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किशोर मेढेकर हे मेंढीपालनाचा व्यवसाय करत होते. हल्लीच त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यानंतर ते मानसिक तणावाखाली असल्याचे सांगण्यात आले आहे. पत्नीच्या निधनानंतर त्यांनी लोकांमध्ये मिसळणे आणि इतरांशी बोलणेही कमी केले होते.
दरम्यान, १८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पन्हाळजे दर्गा जेटी येथील खाडीच्या पाण्यात त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला.
या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अंतर्गत अकस्मात मृत्यू नोंद क्रमांक ८८/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे. या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नसून, पोलीस पुढील तपास करत आहेत.


