(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मित्रांसोबत अंडरआर्म क्रिकेट खेळत असताना अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडलेल्या ३५ वर्षीय तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरीतील चवंडेवठार परिसरात घडली. स्मित नरेंद्र चवंडे (वय ३५, रा. चवंडेवठार, ता. जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १८ ऑक्टोबर रोजी सकाळी स्मित चवंडे हे मित्रांसोबत चवंडेवठार येथील लक्ष्मी चौक परिसरात अंडरआर्म क्रिकेट खेळत होते. खेळ सुरू असतानाच त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत कोसळले. हा प्रकार लक्षात येताच त्यांचे मित्र युगेश सावंत यांनी स्मित यांचे भाऊ सुशांत चवंडे यांना दूरध्वनी करून घटनेची माहिती दिली.
त्यानंतर स्मित यांना सकाळी सुमारे ९.१५ वाजण्याच्या सुमारास उपचारासाठी रत्नागिरीतील परकार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर सकाळी ९.५२ वाजता त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक १३१/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. तरुणाच्या मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट होईल.


