(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील मिळंद येथील कै. आत्माराम आयरे विद्यालयात कै. आत्माराम शिवाजीराव आयरे यांचा ५४ वा स्मृती दिन उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामदा खोरे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुहास आयरे होते.
प्रारंभी कै. आत्माराम आयरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कै. आत्माराम आयरे यांचा स्मृती दिन हा येथील विद्यार्थी आणि पालकांसाठी दसरा-दिवाळीच्या सणासारखा असतो. त्यामुळे या दिवसाची विद्यार्थी आणि पालक आतुरतेने वाट पाहत असतात.
यावेळी बोलताना संस्था अध्यक्ष सुहास आयरे यांनी शासनाच्या शैक्षणिक धोरणांवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, शासनाच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणांमुळे ग्रामीण भागातील शाळा अडचणीत आल्या आहेत. केवळ पटसंख्या कमी असल्याच्या कारणावरून शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जात आहे. पटसंख्येची अट तात्काळ काढून न टाकल्यास येत्या एक-दोन वर्षांत ग्रामीण भागातील सर्वच शाळा बंद होण्याची भीती आहे. त्यामुळे माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन आपल्या शाळा वाचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शासनाच्या या धोरणाविरोधात संस्था चालक, पालक आणि विद्यार्थ्यांनी संघटितपणे आवाज उठवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
राजापूर-लांजा मतदारसंघाचे माजी आमदार गणपतदादा कदम यांनी ग्रामीण भागातील रोजगार आणि स्थलांतराचा प्रश्न अधोरेखित केला. गावात नोकरी, धंदा आणि व्यवसायाच्या पुरेशा संधी उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. गावात येणाऱ्या प्रकल्पांना विरोध केला जातो, ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. उद्योग आले नाहीत तर विकास होणार नाही. तरुण मुंबईला जातील, घरे बंद राहतील आणि त्याचा परिणाम शाळांवरही होऊन त्या बंद पडतील. याचा विचार राज्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींनी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षणमहर्षी चंद्रकांत देशपांडे म्हणाले की, सुहास आयरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या त्यागातून हे ज्ञानमंदिर उभे राहिले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तब्बल ५४ वर्षे ही संस्था अविरत सुरू आहे. या विद्यालयातून प्रशासकीय अधिकारी, वकील, डॉक्टर आणि उद्योजक घडले आहेत. संस्था अध्यक्ष सुहास आयरे यांचे कार्य कौतुकास्पद असून ते समाजासाठी प्रेरणादायी आणि आदर्शवत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उबाठा पक्षाचे जिल्हा उपप्रमुख डोळस यांनी आयरे विद्यालयाला आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमादरम्यान शैक्षणिक वर्षात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या तसेच विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाला शिक्षणमहर्षी चंदुभाई देशपांडे, सुहासभाई आयरे, पाचल गावचे सरपंच बाबालाल फरास सर, माजी उपसरपंच किशोरभाई नारकर, पाचल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आण्णा पाथरे, सामाजिक कार्यकर्ते अनंत कोलते, केंद्रप्रमुख संदीप परटवकर गुरुजी, मिळंद गावच्या सरपंच कीर्ती आयरे, योगेश आयरे यांच्यासह माजी विद्यार्थी, शिक्षकवृंद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

