(रत्नागिरी /प्रतिनिधी)
वयाची तिशी ओलांडली आहे? मग आजाराची लक्षणे दिसण्याची वाट न पाहता आरोग्याची तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ या उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात ‘३० वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ या १०० दिवसांच्या विशेष असंसर्गजन्य आजार (NCD) स्क्रीनिंग अभियानाला सुरुवात झाली आहे. १ सप्टेंबर ते १० डिसेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानात जिल्ह्यातील ३० वर्षे व त्यावरील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यावर भर देण्यात आला आहे.
उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारखे असंसर्गजन्य आजार सुरुवातीच्या टप्प्यात अनेकदा कोणतीही ठळक लक्षणे न दाखविता शरीरात वाढत राहतात. त्यामुळे ‘मला काही त्रास नाही, म्हणजे मी पूर्णपणे निरोगी आहे’ हा गैरसमज टाळून तिशीनंतर नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. अभियानांतर्गत नागरिकांची रक्तदाब, रक्तातील साखर, वजन, उंची आणि BMI यांसारख्या आवश्यक तपासण्या करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पात्र नागरिकांची गृहभेटीद्वारे तोंडाचा, स्तनाचा आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग यासाठी प्राथमिक तपासणी केली जाणार आहे. तपासणीदरम्यान एखाद्या आजाराचा संशय आढळल्यास संबंधित नागरिकाला पुढील तपासणी व उपचारासाठी शासकीय आरोग्य संस्थेत संदर्भित करण्यात येणार आहे. त्यामुळे गंभीर आजाराचे वेळीच निदान होऊन उपचार सुरू करण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यातील आयुष्मान आरोग्य मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालय यांच्या माध्यमातून अभियानाची अंमलबजावणी केली जात आहे. आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका, समुदाय आरोग्य अधिकारी तसेच अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांकडून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत असून पात्र नागरिकांना तपासणीसाठी प्रोत्साहित केले जात आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी ३० वर्षांवरील प्रत्येक नागरिकाने तपासणी करून निरोगी कुटुंब आणि निरोगी समाज घडविण्यास हातभार लावावा, असे आवाहन केले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके यांनीही आजारी पडल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा आजाराचे वेळीच निदान होणे महत्त्वाचे असल्याचे सांगत अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी नियमित आरोग्य तपासणीसोबत संतुलित आहार, व्यायाम आणि व्यसनमुक्त जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन केले आहे. ‘आजची तपासणी, उद्याचे निरोगी आयुष्य’ हा संदेश देत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील ३० वर्षे व त्यावरील सर्व नागरिकांनी जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात जाऊन मोफत NCD तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

