(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील वाटद जिल्हा परिषद गटातील खंडाळा परिसरात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि महावितरणच्या काही कर्मचाऱ्यांच्या कथित मनमानी कारभारामुळे स्थानिक नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. या समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन कारवाई करावी, या मागणीसाठी माहिती अधिकार फेडरेशन रत्नागिरी दक्षिणचे जिल्हा उपाध्यक्ष तथा एन.जी.ओ. संपर्क युनिक फाउंडेशन रत्नागिरीचे अध्यक्ष नंदकुमार बेंद्रे यांनी महावितरणच्या चाफे (ता. व जि. रत्नागिरी) येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
खंडाळा येथे साप्ताहिक बाजारपेठ भरत असून परिसरातील अनेक व्यवसाय वीजपुरवठ्यावर अवलंबून आहेत. याशिवाय महिला बचत गटांमार्फत चालविले जाणारे विविध लघुउद्योगही विजेवर अवलंबून असल्याने वारंवार वीजखंडित होत असल्यामुळे त्यांच्या व्यवसायावर आणि उत्पन्नावर विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, खंडाळा विभागामार्फत कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांकडून स्वतःची स्वतंत्र कामे करून घेतली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच स्मार्ट मीटर बसविण्यास इच्छुक नसलेल्या ग्राहकांवर काही कर्मचाऱ्यांकडून स्मार्ट मीटर बसविण्यासाठी बळजबरी व दबाव आणला जात असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या आहेत.
गरीब शेतकरी आणि ग्रामस्थांकडे सायंकाळी ७ नंतर वीज बिल वसुलीसाठी जाणे, तसेच वीज कनेक्शन बंद करण्याच्या धमक्या देणे, अशा प्रकारच्या तक्रारीही नागरिकांकडून करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
या सर्व बाबी खंडाळा येथील संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास वेळोवेळी आणून देऊनही संबंधित कर्मचाऱ्यांवर ठोस कारवाई होत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करावा, तसेच दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नंदकुमार बेंद्रे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

