(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
तालुक्यातील वेतोशी परिसरात गोवंश हत्येचा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री धाड टाकून दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान तिघांपैकी एक संशयित झाडीतून पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. घटनास्थळावरून गोवंशाचे मांस आढळून आल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
करबुडे हायवे परिसरातील फणसाळे-मधली वाडी, खुरीचा आंबा येथे मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर गोवंश हत्येचा प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना गस्ती दरम्यान मिळाली. त्यानंतर रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. पालवे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने बुधवारी रात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी धाड टाकली. पोलिसांनी अचानक कारवाई केल्याने संशयितांची धावपळ उडाली. या कारवाईत दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले, तर तिसरा संशयित अंधाराचा आणि झाडीचा फायदा घेत पसार झाला. पसार झालेल्या संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक जंगल परिसरात शोधमोहीम राबवत आहे.
कारवाईदरम्यान एका संशयिताने पोलिसांवर हत्यार उगारल्याची माहिती पुढे येत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ सापळा रचत कारवाई केली. पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे दोन संशयितांना ताब्यात घेणे शक्य झाले. घटनास्थळाची पोलिसांनी पाहणी केली असून तेथून गोवंशाचे मांस आढळून आल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. पसार झालेल्या संशयिताचा शोध घेण्यासाठी परिसरातील जंगल आणि झाडीमध्ये पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे.
दरम्यान, सकाळी घटनास्थळी ग्रामस्थ आणि स्थानिक पदाधिकारीही उपस्थित होते. सरपंच निलेश लोढ, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संतोष आंबेकर, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल पवार, पोलीस पाटील विष्णू ठीक आणि ऋतुजा आंबेकर यांनी घटनास्थळी पोलिसांसोबत उपस्थित राहून परिस्थितीची माहिती घेतली. या प्रकरणात नेमके किती गोवंश आणि कोणत्या पद्धतीने हा प्रकार करण्यात आला, तसेच फरार संशयिताची भूमिका काय आहे, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

