(रत्नागिरी / वार्ताहर)
राजापूर तालुक्यातील नाणार बॉक्साईट ब्लॉक प्रकल्पासाठी ७ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली पर्यावरणविषयक जनसुनावणी रद्द करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी मोठ्या संख्येने गावात दाखल होत असून, प्रकल्पाला आणि जनसुनावणीला स्थानिकांचा तीव्र विरोध असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी १ सप्टेंबर २०२६ रोजी पत्र काढले आहे.
मौजे नाणार, ता. राजापूर, जि. रत्नागिरी येथील १४४.९५ हेक्टर क्षेत्रावरील ‘Nanar Bauxite Block’ प्रकल्पाच्या अनुषंगाने ही पर्यावरणविषयक जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. संबंधित प्रकल्पासाठी ७ सप्टेंबर रोजी जनसुनावणी घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या रत्नागिरी कार्यालयाशीही पत्रव्यवहार करण्यात आला होता.
मात्र, सहायक पोलीस निरीक्षक, सागरी पोलीस ठाणे, नाटे यांनी दिलेल्या अहवालानुसार या जनसुनावणीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या अहवालाचा विचार करून उपविभागीय दंडाधिकारी, राजापूर यांनीही संबंधित अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे.
१४ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत असून, त्यासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी गावात येण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच नाणार बॉक्साईट ब्लॉक प्रकल्पाला तसेच प्रस्तावित जनसुनावणीला स्थानिकांचा तीव्र विरोध असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे जनसुनावणीच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने ७ सप्टेंबर रोजी नियोजित केलेली जनसुनावणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाची माहिती उपविभागीय दंडाधिकारी, राजापूर आणि कार्यकारी दंडाधिकारी, राजापूर यांनाही देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या स्वाक्षरीने हे पत्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या रत्नागिरी येथील उप प्रादेशिक अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे.

