(राजापूर / वार्ताहर)
मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील गंगातीठा परिसरात आज दुपारी साडेतीनच्या सुमारास दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांमधील प्रवासी जखमी झाले असून, त्यांना राजापूर ग्रामीण रुग्णालयासह शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातात नेमके किती जण जखमी झाले, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०५ एफव्ही ७२६९ क्रमांकाचे वाहन गोव्याच्या दिशेने जात असताना त्यातून मुंबई, कल्याणच्या दिशेने प्रवास सुरू होता. गंगातीठा परिसरात हे वाहन भरधाव वेगात येत असताना अचानक विरुद्ध दिशेला सरकले आणि समोरून गोव्याच्या दिशेने येणाऱ्या एमएच ४६ सीएच ९१९६ क्रमांकाच्या वाहनाला समोरासमोर जोरदार धडक बसली. या धडकेत दोन्ही वाहनांमधील प्रवासी जखमी झाले.
दोन्ही वाहनांमध्ये नेमके किती प्रवासी प्रवास करत होते, याची माहिती मिळू शकली नाही. मात्र, त्यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश असल्याची माहिती आहे. अपघातानंतर जखमींना राजापूर शहरातील ग्रामीण रुग्णालय तसेच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू होते.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलीस घटनास्थळी तसेच दोन्ही रुग्णालयांमध्ये दाखल झाले होते. पोलिसांकडून अपघाताबाबत माहिती घेण्याचे काम सुरू असून, जखमींची नेमकी संख्या आणि अपघाताचे कारण याबाबत अधिक माहिती घेतली जात आहे.

