( विशेष / प्रतिनिधी )
गेल्या काही महिन्यांपासून थिबा राजासंदर्भात निर्माण झालेल्या ट्रस्टबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. थिबा राजा बुध्द विहार विकास ट्रस्टच्या माध्यमातून समाज स्तरावर दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या भर बैठकीत अध्यक्ष प्रकाश पवार म्हणाले होते की, आपल्या सभागृहाचे जे म्हणणं आहे ते आमचंही म्हणणं आहे सगळी जागा पाहिजे अशा प्रकारचे सगळ्यांचे म्हणणं आहे. इथून पुढे आता ट्रस्टला व्हॅल्यू काय नाय, हा ट्रस्ट रद्द …. ऐका ऐका आता …माझं झाल्यानंतर तुम्हाला काय जे बोलायच ते बोला… सगळ्यांचं म्हणणं आलेलं आहे की, हा ट्रस्ट रद्द पाहिजे हा ट्रस्ट समाज मान्य नाही ओक्के! आम्हीही ते मान्य करतो. असे भर बैठकीत ट्रस्ट रद्द करण्याबाबतचा अध्यक्ष प्रकाश पवार यांनी निर्णय जाहीर केला होता. मात्र ही बैठक होऊन सहा दिवस उलटल्यानंतर अध्यक्षांनी स्वतःच्या शब्दामधे पलटी मारली आहे. त्या बैठकीमध्ये मी ट्रस्ट रद्द करतो असे न म्हणता मीटिंग बरखास्त करतो असे म्हटल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश पवार यांनी शुक्रवारी ( दिनांक १७ जानेवारी २०२५) आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी ट्रस्ट अध्यक्ष प्रकाश पवार, उपाध्यक्ष मारुती कांबळे, भगवान जाधव, सहसचिव सुहास कांबळे, शशिकांत कांबळे, कोषाध्यक्ष प्रीतम आयरे, सल्लागार शिवराज जाधव, मंगेश सावंत, सदस्य दीपक जाधव, भाई जाधव आदी उपस्थित होते.
दिलेल्या प्रेसनोटमद्ये असे नमूद करण्यात आले आहे की, तीन धार्मिक संघटना व भिमयुवा पँथरचे पदाधिकारी तसेच प्रतिनिधी यांनी सभेमध्ये चर्चेत भाग घेऊन सभागृहाचे एकमत झाल्यानेच ट्रस्टची कार्यकारिणी निवड करण्यात आली. तसेच ट्रस्टला मंजूरी मिळाल्यानंतर ट्रस्ट निर्माण करण्यासाठी जो प्रमुख उद्देश होता तो म्हणजे थिबाराजा कैदेत असताना त्यांचे प्रार्थनास्थळ विकसित करणे, ज्या ठिकाणी बुध्द मूर्ती आहे तेथील जमिन बुध्दविहारासाठी मागणी करण्याचे प्रयत्न करण्यात आले. यासाठी तत्कालीन पालकमंत्री व आताचे महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री मा. नामदार उदय सामंत यांच्यामार्फत उत्पादन शुल्क विभागास निवेदन देण्यात आले. रत्नागिरी तालुक्यात ज्या धार्मिक व सामाजिक संघटना आहेत त्या वेगवेगळ्या संघटनांनी या जागेची बुध्दविहारासाठी मागणी केली होती. मात्र सरकारी जमिन मागणीचा प्रमुख हेतू बुध्दविहार बांधणे हाच होता. शासन कोणत्याही एका संघटनेला ही जमिन देणार नाही याची आम्हाला पुरेपूर माहिती असल्यानेच या संघटना एकत्रित येऊन ट्रस्ट निर्माण करण्यात आला.
यापुढे, तत्कालीन राज्य उत्पादन शुल्क मंत्री मा. गणेशजी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली दि. २१/०१/२०१४ रोजी मा.राज्यमंत्री (नगर विकास बंदरे व इतर) यांचे समवेत बैठक झाली. त्या बैठकीत मागणी केलेल्या जमिनीपैकी १५ गुंठे जागा जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचेकडे हस्तांतरीत करण्याबाबत राज्य उत्पादन विभागामार्फत प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रत्नागिरी व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी यांनी सर्व धार्मिक संघटनांची सभा घेतली. आणि तुमच्यामध्ये एकवाक्यता आणावी म्हणजे जमिन देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल अशाही सूचना दिल्या, परंतु वरील धार्मिक संघटनांमध्ये आपलेच संघटनेला ती जमिन मिळावी अशी प्रतिक्रिया दिल्याने प्रस्ताव पुढे पाठविण्यात आला नाही. जमिन बौध्द विहारासाठी राखीव ठेवण्यात आलेली नाही. असे ही नमूद करण्यात आले आहे.
हे प्रकरण गेली काही वर्षे प्रलंबित असल्याने यासाठीच तालुक्यातील धार्मिक संघटना एकत्र येऊन ट्रस्ट गठीत करण्यात आला. एक धार्मिक संघटना यामध्ये सामील झालेली नाही. त्यांना या ट्रस्टमध्ये समाविष्ट करुन घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. दि.०६/०२/२०२४ रोजी या ट्रस्टचे पदाधिकारी व उत्पादन शुल्क विभाग व जिल्हाधिकारी आणि तत्कालीन पालकमंत्री व आताचे उद्योगमंत्री मा. नामदार उदय सामंत यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील भूमापन क्र. २४८/१ मधील १७.५० गुंठे जागा गौतम बुध्द विहारासाठी आवश्यक असलेली जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे हस्तांतरीत करण्यासाठी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क यांनी ना हरकत प्रस्ताव शासनास सादर करण्याबाबत सूचना दिल्या, त्यानुसार नगर भूमापन अधिकारी, तहसिलदार व अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क यांचे संयुक्त समितीने जागेची मोजणी करुन १७.५० गुंठे क्षेत्र बुध्दविहारासाठी मा. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचेकडे हस्तांतरण करण्यास हरकत नसलेचा अहवाल दि.२८/०२/२०२४ ने सादर केला. जिल्हाधिकारी यांचा अहवाल शासनाकडे सादर झाल्यानंतर गृहविभागाकडील पत्र क्र.बी.जी.टी.१०२४/प्र.क्र.३६/राउशु-१ दि.२४ जून २०२४ ने संयुक्त समितीने मोजणी केलेली जमिन जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचेकडे हस्तांतरण करण्यास शासनाने मान्यता दिल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी निधी उपलब्धता करण्याबाबत उदय सामंतांकडे केली विनंती
या जागेवर भव्य दिव्य असे बुध्दविहार व्हावे अशीच ट्रस्टचे पदाधिकारी व तालुक्यातील तमाम बौध्द जनतेची विचारधारा आहे. मा. नामदार उदय सामंत, उद्योगमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे ही भव्य वास्तू उभारण्यासाठी निधीची उपलब्धता करण्याबाबत ट्रस्टचे पदाधिकारी यांनी विनंती केली. तेव्हा विहारासाठी स्वतंत्र असा निधी उपलब्ध होणार नाही म्हणून कम्युनिटी सेंटर (बुध्दविहार) या नावाखाली निधी उपलब्ध करुन दिल्याचे पत्रातून स्पष्ट करण्यात आले आहे.
….असे कोणतेही विधान अध्यक्ष यांनी केलेले नाही.
या जागेत असलेली बुध्दमूर्ती हलविण्यात येत असल्याबाबत स्थानिक वृत्तपत्रात बातमी प्रसिध्द झाल्यावरुन रत्नागिरी नगर परिषदेकडे भिम युवा पँथर व भारतीय बौध्दमहासभा (सामील न झालेली) यांनी निवेदन दिल्याने सर्व सामान्य जनतेला वस्तुस्थिती समजण्याच्या दृष्टीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. याठीकाणी असलेली बुध्दमूर्ती त्याच ठिकाणी राहील ती हलविण्यात येणार नाही असे सभागृहाला सांगण्यात आले. ट्रस्ट बरखास्त करण्यात आला असे कोणतेही विधान अध्यक्ष यांनी केलेले नाही. यासभेत काही समाजबांधव आकसापोटी कम्युनिटी सेंटर (विविध उपयोगी) नको बुध्दविहारच हवे अशी मागणी केली. त्याचा खुलासा करताना या जागेत बुध्दविहारच होणार आहे असे सांगण्यात आले. काही समाजबांधव समाजामध्ये गैरसमज पसरवण्याच प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या भूलथापांना जनतेने गैरसमज करून न घेता बळी पडू नये. ट्रस्टचे अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधल्यास त्यांना सविस्तर माहिती देण्यात येईल. ट्रस्ट बरखास्त करण्यात आलेला नाही त्यामुळे समाजबांधवांनी गैरसमज करुन घेऊ नये. असेही पत्रातून आवाहन करण्यात आले आहे.