(रत्नागिरी /प्रतिनिधी)
ग्रामपंचायत स्तरावर शासनाच्या विविध ऑनलाइन सेवा आणि प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी सांभाळणाऱ्या संगणक परिचालकांच्या मानधनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जूनपासून मानधन रखडल्याने गणेशोत्सवाच्या तोंडावर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून, जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांचे थकीत मानधन तातडीने खात्यावर जमा करावे, अशी मागणी रत्नागिरी तालुका संगणक परिचालक संघटनेने पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री उदय सामंत तसेच राजापूरचे आमदार किरण सामंत यांना निवेदन सादर केले. ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांच्या मानधनासाठी शासनाने १६व्या वित्त आयोगातून स्वतंत्र तरतूद केलेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर मानधन कोणत्या निधीतून आणि कोणत्या पद्धतीने अदा करावे, याबाबतही स्पष्ट मार्गदर्शक सूचना नसल्याने मानधन रखडल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
ग्रामपंचायतींच्या दैनंदिन कामकाजात संगणक परिचालकांची भूमिका महत्त्वाची आहे. विविध ऑनलाइन सेवा, नोंदी, अर्ज प्रक्रिया आणि प्रशासकीय कामांमध्ये त्यांचा सहभाग असतो. मात्र, कामकाजाची जबाबदारी पार पाडूनही वेळेवर मानधन मिळत नसल्याने त्यांच्या आर्थिक अडचणी वाढत आहेत. वाढत्या महागाईच्या काळात तुटपुंज्या मानधनातून घरखर्च भागविताना कसरत करावी लागत असतानाच सलग तीन महिन्यांचे मानधन थकीत असल्याने आर्थिक नियोजन कोलमडल्याची व्यथा संगणक परिचालकांनी मांडली आहे.
गणेशोत्सवाच्या तोंडावर आर्थिक कोंडी
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. सणासुदीची खरेदी, घरगुती खर्च, मुलांचे शैक्षणिक खर्च आणि अन्य अत्यावश्यक गरजांसाठी प्रत्येक कुटुंबाला आर्थिक नियोजन करावे लागते. अशा परिस्थितीत तीन महिन्यांचे मानधन रखडल्याने संगणक परिचालकांसमोर आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वीच जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांचे थकीत मानधन अदा करून संगणक परिचालकांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी संघटनेने केली आहे.
प्रशासनाने ‘निधीचा पेच’ सोडवावा
मानधनासाठी निधीची तरतूद नसणे आणि तो कोणत्या निधीतून द्यायचा याबाबत स्पष्टता नसणे, या प्रशासकीय पेचाचा फटका मात्र प्रत्यक्ष काम करणाऱ्या संगणक परिचालकांना बसत आहे. त्यामुळे शासनाने याबाबत तातडीने स्पष्ट निर्णय घेऊन मानधनाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी होत आहे. निवेदन देताना रत्नागिरी जिल्हा संगणक परिचालक संघटनेचे संस्थापक तथा जिल्हाध्यक्ष हरीश वेदरे, रत्नागिरी तालुकाध्यक्ष समीर गोताड, कार्याध्यक्ष आसिफ नाकाडे, सचिव भूषण सुर्वे, खजिनदार नीलेश शिंदे, संपर्कप्रमुख वैभव गुरव, किरण कुळ्ये, माजी लांजा तालुकाध्यक्ष संतोष कांबळे आणि संगमेश्वर तालुकाध्यक्ष प्रवीण यादव उपस्थित होते.
ग्रामपंचायतींच्या डिजिटल कामकाजाचा भार वाहणाऱ्या संगणक परिचालकांचेच मानधन रखडत असेल, तर ‘डिजिटल प्रशासन’च्या या व्यवस्थेतील आर्थिक नियोजनाचा प्रश्नही तितकाच गंभीर आहे. गणेशोत्सवापूर्वी थकीत मानधनाचा प्रश्न निकाली काढून प्रशासनाने परिचालकांना दिलासा देण्याची गरज आहे.

