(मुंबई / वृत्तसंस्था)
नेपाळमध्ये आलेल्या महापुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिक तसेच धार्मिक पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध यंत्रणांकडून अहोरात्र प्रयत्न सुरू आहेत. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र शासन तसेच केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातून आवश्यक मदत आणि बचावकार्य करण्यासाठी कार्यवाही केली जात आहे.
आत्तापर्यंत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील 404 नागरिक सुरक्षित असून 338 नागरिकांशी संपर्क झाला आहे. तिबेटमधील सागा येथून 41 जण शनिवारी परतले, तर 106 जण रविवारी (30 ऑगस्ट) पहाटे 4.30 वाजता नागपूरला पोहोचले. आणखी जवळपास 143 नागरिक राज्यात सुरक्षितपणे परतण्याच्या मार्गावर आहेत. या सर्व नागरिकांना सुरक्षितपणे त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी योग्य नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रातील 45 पर्यटकांच्या एका ग्रुपने शनिवारी (29 ऑगस्ट) भारतीय हद्दीत प्रवेश केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून नाशिक, पुणे, मुंबई आणि अहिल्यानगर येथील नागरिक नेपाळमध्ये धार्मिक पर्यटनासाठी गेले होते. महापुराच्या काळात हे नागरिक चितवन येथे होते. काठमांडूकडे जाणारे मार्ग बंद असल्याने त्यांना नेपाळमधील लुंबिनी मार्गे भारतात आणण्यात येत आहे. हे पर्यटक अयोध्येला पोहोचल्यानंतर शासनाच्या सूचनेनुसार त्यांच्या पुढील प्रवासाचे नियोजन केले जाणार आहे.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून 28 ऑगस्टअखेर चीनमधून नेपाळमध्ये सुरक्षितपणे प्रवेश केलेल्या 149 भारतीय पर्यटकांची यादी राज्यांना पाठवण्यात आली आहे. या यादीतील महाराष्ट्रातील नागरिकांना त्यांच्या संबंधित जिल्ह्यांमध्ये सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकारानंतर बस तसेच प्रवासासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली असून, या पर्यटकांना भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नागपूर येथील 106 नागरिकांचाही प्रवास बिहारमार्गे नागपूरच्या दिशेने सुरू झाला आहे. त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक समन्वय साधला जात आहे.
नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिक आणि धार्मिक पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी राज्य सरकारने हेल्पलाईन क्रमांकही जारी केले आहेत. मंत्रालयातील नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असून, या कक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नागरिकांना सहाय्य आणि मदतकार्य उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय साधला जात आहे.
याशिवाय विविध शासकीय यंत्रणांकडून नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांशी सातत्याने संपर्क साधला जात आहे. नागरिकांची सुरक्षितता आणि त्यांना भारतात परत आणणे याला प्राधान्य देण्यात आले असून, सर्वांना सुरक्षितपणे त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक व्यवस्था केली जात आहे.

