( चिपळूण )
शहरालगतच्या सवतसडा धबधब्याच्या प्रवाहात केरळमधील एक तरुण वाहून गेल्याचा मेसेज सोशल मीडियावर फिरला आणि पाहता पाहता एनडीआरएफ, पोलिस यंत्रणेची मोठी धावपळ उडाली. मुसळधार पावसात तासभर चाललेल्या शोधमोहीमेनंतर अखेर तो तरुण सुखरूप असल्याचे स्पष्ट झाले. शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या या प्रकाराने चांगलीच खळबळ उडाली.
सायंकाळी सातच्या सुमारास केरळमधील दोन तरुण पर्यटनासाठी पेढे (ता. चिपळूण) येथील सवतसडा धबधब्यावर आले होते. त्यातील एक तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचे त्याच्या मित्राने सांगताच घबराट पसरली. घटनेची माहिती काहींनी थेट प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना दिली. त्यांनी तातडीने संदेश पाठवताच पोलीस आणि एनडीआरएफची पथके घटनास्थळी दाखल झाली. पावसाचा जोर, त्यातच काळोख… तरीही पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस व एनडीआरएफच्या जवानांनी शोधमोहीम सुरू केली. परिस्थिती प्रतिकूल असतानाही यंत्रणा घटनास्थळी ठाण मांडून होती.
सुखरूप असल्याची खात्री
दरम्यान, काही वेळाने पोलिसांनी एक तरुण ताब्यात घेतला. त्याच वेळी स्थानकात आलेल्या फोनवरून समजले की वाहून गेल्याचे समजलेला तरुण प्रत्यक्षात सुखरूप असून तो स्वतःहून पोलिस स्थानकात येत आहे. ही माहिती मिळताच यंत्रणेने सुटकेचा निःश्वास टाकला आणि सुरू असलेली मोहीम थांबविण्यात आली.

