(चिपळूण / वार्ताहर)
चिपळूण तालुक्यातील आंबडस परिसरातील खांदाट गवळवाडी येथील चिरणी फाट्याजवळ दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन २१ जण जखमी झाल्याची घटना घडली. जखमींमध्ये १८ प्रवासी, दोन चालक आणि एका वाहकाचा समावेश आहे. सर्व जखमींना तातडीने कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूणहून चोरवणेच्या दिशेने जाणारी एसटी बस आणि कासईहून चिपळूणकडे येणारी एसटी बस आंबडस परिसरातील खांदाट गवळवाडी येथील चिरणी फाट्याजवळील वळणावर समोरासमोर धडकल्या. दोन्ही बसची धडक जोरदार असल्याने बसमधील अनेक प्रवाशांना दुखापत झाली.
अपघाताचे ठिकाण हे तीव्र उतार आणि धोकादायक वळणाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. या ठिकाणी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्यात आले. जखमींना स्थानिकांच्या मदतीने तसेच उपलब्ध यंत्रणेच्या सहाय्याने दोन्ही बसमधून बाहेर काढण्यात आले आणि तातडीने कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातामुळे या मार्गावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
एसटी महामंडळाचे आगार प्रमुख रणजित राजेशिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात एकूण २१ जण जखमी झाले आहेत. यामध्ये १८ प्रवासी, दोन चालक आणि एका वाहकाचा समावेश आहे. जखमींवर कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

