(गणपतीपुळे / वैभव पवार)
आखाती देशांतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याने गणपतीपुळे परिसरातील उपहारगृहे व हॉटेल्समध्ये जेवण-नाश्त्याची व्यवस्था विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी गणपतीपुळे देवस्थान समितीने स्तुत्य पुढाकार घेत उद्यापासून (१ एप्रिल) मंदिरात सर्व भाविकांसाठी मोफत नाश्त्याची सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
गणपतीपुळे हे जागतिक स्तरावर ओळखले जाणारे पर्यटनस्थळ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने येथे दररोज मोठ्या संख्येने भाविक व पर्यटक दाखल होतात. मात्र, गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याने स्थानिक हॉटेल व्यवसायावर परिणाम झाला असून, अनेक ठिकाणी चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. तरीही वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर जेवण व नाश्त्याची व्यवस्था अपुरी पडत असल्याचे चित्र आहे.
या परिस्थितीची दखल घेत देवस्थान समितीने मंदिर परिसरात सूचना फलक लावून मोफत नाश्त्याची वेळ सकाळी ८ ते १० अशी निश्चित केली आहे. गॅस पुरवठा सुरळीत होईपर्यंत ही सेवा सुरू राहणार असून, भाविकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
यापूर्वीही देवस्थान समितीने महाप्रसाद वितरणाच्या वेळेत वाढ करून भाविकांची सोय करण्याचा प्रयत्न केला होता. दुपार व रात्रीच्या सत्रातील वेळ वाढवल्यामुळे भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. त्यानंतर आता नाश्त्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देत देवस्थानने पुन्हा एकदा संवेदनशीलता दाखवली आहे.
या निर्णयामुळे सध्या निर्माण झालेल्या अडचणीच्या काळात भाविकांना मोठा दिलासा मिळाला असून, विविध भागांतून येणाऱ्या भक्तांकडून या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे.

