(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड ग्रामपंचायतीच्या अखत्यारितील महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष विलास पांडुरंग राणे यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन (RTO) या संस्थेच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. शिक्षण, पर्यटन आणि पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या या संस्थेने राणे यांच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना विशेष गौरवपत्र प्रदान केले.
विलास राणे यांनी १५ ऑगस्ट २०२५ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मालगुंड ग्रामपंचायतीअंतर्गत तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. या कालावधीत त्यांनी गावातील अंतर्गत वाद, मतभेद आणि तंटे सामंजस्यपूर्ण, तटस्थ आणि कौशल्यपूर्ण पद्धतीने सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या कायदेशीर तसेच व्यावहारिक दृष्टिकोनामुळे गावात शांतता, सलोखा आणि एकोप्याचे वातावरण निर्माण होण्यास मदत झाली, असे संस्थेने गौरवपत्रात नमूद केले आहे.
सुजाण आणि कर्तव्यदक्ष नेतृत्वामुळे समाजात कायदा व सुव्यवस्थेचे पालन होण्यास हातभार लागतो, तसेच भावी पिढीसमोर समाजहिताचे आदर्श उदाहरण निर्माण होते, असेही संस्थेने गौरवपत्रात म्हटले आहे. राणे यांच्या निःस्वार्थ आणि उल्लेखनीय समाजसेवेचे विविध स्तरांतून कौतुक होत असून, त्यांच्या यशस्वी कार्यकाळाची आणि सामाजिक योगदानाची दखल घेऊन हा विशेष सन्मान करण्यात येत असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.
मालगुंड ग्रामपंचायतीमध्ये नुकत्याच झालेल्या विशेष ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या सरपंच श्वेता खेऊर यांच्या हस्ते विलास राणे यांना हे गौरवपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजू साळवी, उपसरपंच स्मिता दुर्गवळी, ग्रामविकास अधिकारी प्रक्षाळे, माजी सभापती प्रकाश साळवी, माजी सरपंच दीपक दुर्गवळी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी पदाधिकारी, विविध समित्यांचे सदस्य, विविध खात्यांचे अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशनकडून विशेष गौरवपत्र मिळाल्याबद्दल विलास राणे यांचे मालगुंड ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

