(गणपतीपुळे / वैभव पवार)
जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, वाटद कवठेवाडीच्या विद्यार्थ्यांची वर्षासहल पावसाच्या सरींचा आनंद घेत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. हिरवाईने नटलेला निसर्ग, बरसणारा पाऊस आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यामुळे वर्षासहलीला आनंदाची रंगत आली.
या वर्षासहलीदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, नेतृत्वगुण, शारीरिक तंदुरुस्ती आणि खिलाडूवृत्ती विकसित व्हावी, या उद्देशाने कबड्डी, खो-खो आणि रस्सीखेच यांसारख्या पारंपरिक मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले. पावसात खेळताना विद्यार्थ्यांनी केलेली धमाल आणि उत्साह हा सहलीचा विशेष आकर्षणाचा भाग ठरला.
या उपक्रमात पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. पालकांनी विद्यार्थ्यांसोबत विविध खेळांमध्ये सहभागी होत सहलीचा आनंद द्विगुणित केला. त्यामुळे विद्यार्थ्यांना मनोरंजनासोबतच पालक, शिक्षक आणि मित्रमैत्रिणींसोबत प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा प्रगतशील शेतकरी उदय रहाटे, शाळेचे बालरक्षक विश्वनाथ शिर्के आणि पालक मारुती कुर्टे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कोकणातील निसर्गसंपदा, येथील जीवनशैली, शेतीचे महत्त्व, शेतीतील विविध कामे तसेच निसर्गाचे विविध पैलू याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. चर्चात्मक पद्धतीने विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या जिज्ञासेला चालना देण्यात आली.
पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी देणारी ही वर्षासहल आनंददायी आणि ज्ञानवर्धक ठरली. ‘निसर्गाच्या सान्निध्यातून आनंदी आणि अनुभवाधारित शिक्षण’ या संकल्पनेची प्रभावी प्रचिती या उपक्रमातून आली.
या उपक्रमाचे नियोजन रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार आणि वाटद केंद्राच्या केंद्रप्रमुख मीनाक्षी मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक माधव अंकलगे आणि शिक्षिका पूनम कुलकर्णी यांनी केले. वर्षासहल यशस्वी करण्यासाठी शाळा विकास समितीचे अध्यक्ष अप्पा धनावडे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा निकिता कुर्टे तसेच पालक आणि ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले.
विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थ यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही वर्षासहल अविस्मरणीय ठरली. पावसाच्या सरींत निसर्गाचा आनंद घेत, खेळातून उत्साह अनुभवत आणि प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळवत विद्यार्थ्यांनी या सहलीच्या आनंददायी आठवणी मनात साठवून ठेवल्या.

