(जाकादेवी / वार्ताहर)
आदिमानवाने आपल्या विचारांची, अनुभवांची आणि सभोवतालच्या जगाची नोंद ज्या दृश्य माध्यमातून केली, त्या कातळशिल्पांकडे केवळ प्राचीन चित्रे म्हणून न पाहता मानवाच्या पहिल्या Visual Communication ची भाषा म्हणून त्यांचा अभ्यास करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभ्यासक आणि कोकणातील कातळशिल्पांचे शोधकर्ते-संशोधक सुधीर (भाई) रिसबूड यांनी केले.
आगम द कॉलेज ऑफ अप्लाइड आर्ट, रत्नागिरी येथे कातळशिल्प या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमांतून झालेल्या या व्याख्यानाला मुंबई, पुणे, नाशिक तसेच अन्य भागांतील सुमारे ५० विद्यार्थी सहभागी झाले होते. सुमारे दोन तासांच्या या व्याख्यानात रिसबूड यांनी PPT Presentationच्या माध्यमातून कातळशिल्पांचा इतिहास, त्यातील प्रतिमा व प्रतीकात्मकता तसेच त्यांचा कलात्मक आणि संवादाच्या दृष्टीने असलेला महत्त्वपूर्ण संदर्भ विद्यार्थ्यांसमोर मांडला.
कातळशिल्पांमधील प्रतीक आणि प्रतिमा कशा समजून घ्याव्यात, त्यांचा शोध कसा घ्यावा आणि त्यांचा अभ्यास कोणत्या पद्धतीने करावा, याबाबत रिसबूड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इतिहास, पुरातत्त्व, मानवी कल्पनाशक्ती, निरीक्षणशक्ती, दृश्य मांडणी आणि संवादाची गरज या विविध पैलूंची सांगड घालत त्यांनी कातळशिल्पांचे विश्लेषण केले.
आजच्या अर्थाने लेखनाची भाषा उपलब्ध नसतानाही आदिमानवाने रेषा, आकार, प्रतीक, प्रतिमा आणि दृश्य मांडणीच्या माध्यमातून आपल्या अनुभवांचे व विचारांचे संप्रेषण केले. त्यामुळे कातळशिल्पे ही केवळ ऐतिहासिक अवशेष नसून मानवी सर्जनशीलता आणि संवादकौशल्याच्या विकासाची महत्त्वपूर्ण दृश्य साक्ष आहेत, असे रिसबूड यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केले.
‘कल्पनेपेक्षा भन्नाट मांडणी’ हा कातळशिल्पांचा विशेष पैलू विद्यार्थ्यांसमोर मांडताना, अत्यंत मर्यादित साधनांमध्ये आदिमानवाने केलेली दृश्य रचना, प्रतीकात्मकता आणि सूक्ष्म निरीक्षणशक्ती यांचा कलाशिक्षणाच्या दृष्टीने अभ्यास करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कातळशिल्पांमध्ये इतिहास, पुरातत्त्व, मानवी कल्पना, निरीक्षणशक्ती, प्रतीकात्मकता आणि दृश्य रचना यांचा सुरेख मिलाफ दिसतो. त्यामुळे आधुनिक कला व डिझाइनच्या विद्यार्थ्यांसाठी कातळशिल्पांचा अभ्यास Visual Communication, Symbolism, Storytelling आणि Design Thinking समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने आगम द कॉलेज ऑफ अप्लाइड आर्टच्या वतीने सुधीर (भाई) रिसबूड यांचा शाल, श्रीफळ आणि रोप देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांना कलेच्या इतिहासाकडे तसेच आपल्या परिसरातील समृद्ध कलावारशाकडे चिकित्सक आणि अभ्यासपूर्ण दृष्टिकोनातून पाहता यावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
कोकणातील कातळशिल्पांसारख्या महत्त्वपूर्ण दृश्य वारशाचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा, त्यामागील सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि कलात्मक संदर्भ समजून घ्यावेत तसेच प्राचीन दृश्य भाषेचा आधुनिक कला व डिझाइनशी संबंध जोडावा, या उद्देशाने या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ‘मानवाने चित्र का काढले?’ या प्रश्नापासून ‘चित्रातून संवाद कसा साधला?’ या मूलभूत प्रश्नापर्यंत विद्यार्थ्यांना विचार करण्याची नवी दृष्टी या व्याख्यानातून मिळाली. कातळावर कोरलेल्या प्रतिमा या केवळ भूतकाळाच्या खुणा नसून मानवाच्या सर्जनशील विचारांची आणि संवादाच्या उत्क्रांतीची पहिली पाने आहेत, हा महत्त्वपूर्ण विचार या व्याख्यानातून विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचला.

