(मुंबई / वृत्तसंस्था)
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे प्रशासनाने दिलासादायक निर्णय घेतला आहे. प्रवाशांची वाढती मागणी आणि सणासुदीच्या काळातील अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन अहमदाबाद जंक्शन ते मंगळुरू जंक्शनदरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक विशेष रेल्वेच्या फेऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.
गाडी क्रमांक ०९४२४ अहमदाबाद-मंगळुरू जंक्शन साप्ताहिक विशेष ट्रेनची सेवा आता २७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. ही गाडी दर शुक्रवारी धावणार आहे. त्याचप्रमाणे परतीच्या प्रवासातील गाडी क्रमांक ०९४२३ मंगळुरू जंक्शन-अहमदाबाद साप्ताहिक विशेष ट्रेनची सेवा २८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली असून, ही गाडी दर शनिवारी धावणार आहे.
विशेष म्हणजे १६ ऑक्टोबर २०२६पर्यंत गाडी क्रमांक ०९४२४ आणि १७ ऑक्टोबरपर्यंत गाडी क्रमांक ०९४२३ सध्याच्या पावसाळी वेळापत्रकानुसार धावतील. त्यानंतर २३ ऑक्टोबरपासून अहमदाबाद-मंगळुरू गाडीला विना-पावसाळी वेळापत्रक लागू होईल. या वेळापत्रकानुसार गाडी क्रमांक ०९४२४ अहमदाबादहून दर शुक्रवारी दुपारी ४ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजता मंगळुरू जंक्शनला पोहोचेल.
परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०९४२३ मंगळुरू जंक्शनहून दर शनिवारी रात्री १० वाजून ३० मिनिटांनी सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे २ वाजून १५ मिनिटांनी अहमदाबाद जंक्शनला पोहोचेल. ही सेवा २४ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत विना-पावसाळी वेळापत्रकानुसार धावणार आहे.
या विशेष ट्रेनला गुजरात आणि महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामध्ये नडियाद, आणंद, वडोदरा, भरूच, सुरत, वापी, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड यांचा समावेश आहे. पुढे ही गाडी थिविम, करमळी, मडगाव, काणकोण, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, मुरुडेश्वर, भटकळ, उडुपी, मुल्की आणि सुरतकलपर्यंत धावते.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणाकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. अशा परिस्थितीत या विशेष रेल्वेच्या सेवेला मिळालेली मुदतवाढ मुंबई, पालघर तसेच कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि इतर भागात जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. प्रवाशांनी विस्तारित सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे. रेल्वेच्या वेळापत्रकाची अद्ययावत माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत रेल्वे संकेतस्थळ किंवा NTES/RailOne ॲपवर माहिती तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

